कृषी विभागातील पदे भरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:27 AM2021-03-06T04:27:44+5:302021-03-06T04:27:44+5:30
ब्रह्मपुरी : शासकीय कार्यालयातील तसेच कृषी विभागातील विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला आहे. अनेक योजनांचा ...
ब्रह्मपुरी : शासकीय कार्यालयातील तसेच कृषी विभागातील विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला आहे. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येत आहेत. परंतु, महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामांवर परिणाम झाला आहे. यातील काही रिक्त पदे अनुकंपा तत्त्वातील आहेत.
रस्त्यावर नागरिकांचे अतिक्रमण
कोरपना : नांदा गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये परिसरात वाहनांची संख्या वाढली. या परिसरातील रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला. त्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी
नागभीड : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरूस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अनेकांकडे आरोग्यसेतू अॅप डाॅऊनलोड
मूल : कोरोना संसर्ग असलेल्या तसेच बाधितांशी संपर्क आल्यास ‘आरोग्यसेतू’ अॅप यूजर्सला अलर्ट करते. शासनाने अँड्राईड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी कोविड-१९ ट्रेसिंग अॅप इलेक्ट्रानिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरने (एनआयसी) हे अॅप विकसित केले आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा अनेकांनी आरोग्यसेतू ॲप डाॅऊनलोड केला आहे.
रेडियमअभावी अपघाताची शक्यता
जिवती : तालुक्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावून अपघात टाळावा, अशी मागणी सहयोगी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
मोकाट जनावरांमुळे पिकांची नासाडी
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील काही गावांमध्ये सिंचन सुविधा आहे. त्यामुळे दुबार पीक घेतल्या जाते. विविध रोगांच्या प्रादुर्भावापासून शेतकरी कसेबसे आपल्या पिकांचे संरक्षण करीत आहेत. मात्र मोकाट जनावरांमुळे पीके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
पळसगाव पुलाची उंची वाढवा
चिमूर : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या काही गावातील नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून दिलासा देण्याची मागणी केली जातआहे.
वीज ग्राहकांना त्रास
चिमूर : तालुक्यातील काही गावांमध्ये विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.