५२५ गावांत मार्चमध्येच महिलांच्या डोक्यावर हंडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:15+5:302021-03-04T04:52:15+5:30
चंद्रपूर : थंडी ओसरल्याने उन्हाची काहिली वाढू लागली. परिणामी, यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील ५२५ गावांतील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन ...
चंद्रपूर : थंडी ओसरल्याने उन्हाची काहिली वाढू लागली. परिणामी, यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील ५२५ गावांतील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने ५२५ गावांसाठी २०२०-२०२१ चा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला. त्यासाठी १५ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला; परंतु अद्याप निधी न मिळाल्याने उपाययोजनांच्या कामांना पुन्हा विलंब होऊन पाणीटंचाईचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या कमीच पाऊस झाला. परिणामी, सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. जिल्ह्याची भूजल पातळीही खालावत असून बोअरवेल व विहिरी तळ गाठत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५२५ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. भूजल सर्वेक्षण विभागानेही यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून १९ जानेवारी २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. या आराखड्यानुसार भाग दोनमध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान ५२५ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी ६३८ कामांचे नियोजन करण्यात आले. भाग एक, दोन व तीनसाठी १४ कोटी ९६ लाखांच्या निधीची गरज आहे. शासनाकडून किमान पहिल्या भागातील १२ कोटी ७४ लाखांचा निधी तात्काळ मिळाला नाही तर उपाययोजनेची कामे प्रभावित होऊ शकतात.
सिंदेवाही, गोंडपिपरी तालुक्याला सर्वाधिक झळ
संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार, सिंदेवाही व गोंडपिपरी तालुक्यात संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे विहिरी खोल करणे, गाळ उपसणे, इनबोअर वेल, नवीन विंधन विहिरी, नवीन कूपनलिका, नळयोजना दुरुस्ती आदी कामे प्रस्तावित आहेत.
२३ खासगी विहिरींचे अधिग्रहण
नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटंकावे लागणार नाही, यासाठी कृती आराखड्यात २३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याची बाब नमूद आहे. याशिवाय, हातपंपाची विशेष दुरुस्ती (अपारंपरिक) व अन्य उपाययोजनांचा समावेश आहे.
एप्रिल- जूनमध्ये ३० टँकरचा प्रस्ताव
संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याचे तीन भाग करण्यात आले. दुसऱ्या भागात एप्रिल- जूनमध्ये ३० गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता २ कोटी २२ लाख २५ हजारांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला.
एक हजार ३३३ उपाययोजना प्रस्तावित
जिल्ह्यातील पाणीटंचाई उपाययोजना भाग एक, दोन व तीनसाठी एक हजार ३३३ उपाययोजना प्रस्तावित आहे. त्यामध्ये जानेवारी ते मार्चमध्ये ६३८ तर एप्रिल- जूनसाठी ६९५ कामांचा समावेश आहे. दोन्ही टप्प्यात एक हजार ३३३ गावांना संभाव्य टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
कोट
संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. लवकरच निधी मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, पाणीटंचाईची कायमस्वरूपी कामे आता वर्षभरातही करता येतात.
-गिरीश बारसागडे, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा), जि. प., चंद्रपूर