दारिद्र्याने हतबल मुलांचे
By admin | Published: November 14, 2016 12:52 AM2016-11-14T00:52:03+5:302016-11-14T00:49:07+5:30
गरिबीने हतबल झालेल्या व समाजाने नाकारलेल्या असंख्य चिमुकल्या निरपराध बालकांना खेळण्या-बागळण्याच्या...
आयुष्य उमलण्यापूर्वीच कोमेजले !
हाती भिक्षेचा कटोरा : चिमुकल्यांच्या आयुष्यात प्रकाश पेरणार कोण?
प्रकाश काळे गोवरी
गरिबीने हतबल झालेल्या व समाजाने नाकारलेल्या असंख्य चिमुकल्या निरपराध बालकांना खेळण्या-बागळण्याच्या वयात रस्त्यावर, रेल्वे फलाटावर, बसस्थानकावर हाती भिकेचा कटोरा घेऊन त्यांच्यावर भीक मागण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक निरागस बालकांचे बालपण फुलविण्याच्या वयात त्यांच्या आयुष्याचे मातेरे झाले आहे.
शाळा गळती झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कोट्यावधी रुपयाचा खर्च करते. समाजातील कोणताही बालक अन् बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, असा त्या माग उद्देश्य आहे. मात्र गरिबीचा प्रचंड विळखा पडलेल्या निरागस बालकांसाठी शिक्षण तर दूरच. परंतु दोन वेळेचा सांजेची भाकर मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. बालकदिनी गरिबांच्या मुलांसोबत सेल्फी काढणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.
बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात मायेचा पदर धरून कामावर जाणाऱ्या निरागस बालकाच्या आईला बोलते केले असता, ती माऊली म्हणाली की, आम्हाला दोन वेळेच्या सांजेची भाकर मिळत नाही. मजुरी मिळाली तर बरं, नाहीतर उपाशीच झोपून रात्र काढावी लागते. तेव्हा तुकडाभर भाकरसुद्धा कोणी देत नाही. आभाळाखाली अख्य आयुष्यच घालविताना घरादारांचा कोणताही आधार नाही. ऊन, वारा, पाऊस, थंडीत वणवण भटकंती करताना जागा मिळेल तिथे राहायच. मिळेल तर चार पैसे जमवायचे. सांजेला पोटाची सोय करायची आणि आयुष्य जगायचं.
मग पोराच्या शिक्षणाचे काय, असं विचारताच ती म्हणाली की, आमाले शिक्सन-बिक्सन काई नको. इथं पोटाची भाकर मियत नाही, तिथं शिक्सनाचे काय, असा सवाल करीत तिने डोळ्याला पाणी आणले.
जेथे दोन वेळेच्या पोटाचे वांदे आहेत, तिथे आईसोबत मजुरीसाठी पदर धरून जाणाऱ्या निरागस चिमुकल्यांचे बालपण परिस्थितीने गांजले आहे. मायेसोबत काम करायला गेले नाही तर उपाशीच झोपावे लागणार. मग पोट महत्त्वाचे की शिक्षण, हा एकच प्रश्न मनाला विचार करायला लावणारा आहे. एकीकडे एबीसीडी म्हणून नियमित इंग्रजी शाळेत जाणारी मुले तर दुसरीकडे परिस्थितीमुळे शिक्षणाचा जराही गंध नसलेली निरागस बालके हॉटेल, पानटपरीवर काम करताना दिसतात. खाचखडग्यातून वाट काढताना आयुष्याचा शेवटच्या श्वासापर्यंत संघर्षमय जीवन जगणे त्यांच्या नशिबी कायमच असते. त्यांचे कोवळे बालपन कामावर हरवून जाते. फक्त त्यांना माहिती आहे दोन वेळेच्या पोटाचा सवाल.
आज बालकदिन
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस बालकदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र शिकण्याच्या कोवळ्या वयात या बालकांच्या हाती दुर्दैवाने पाटीपुस्तकांऐवजी भिकेचा कटोरा आला आहे. त्यामुळे आयुष्य घडविण्याच्या वयात त्यांचे आयुष्यच करपून गेले आहे. त्यांच्यासाठी बालकदिनाचे महत्त्व नाही.