तीन जिल्ह्यांतील कृषिपंपांना दिवसा १२ तास वीजपुरवठा; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
By राजेश मडावी | Published: October 25, 2023 03:46 PM2023-10-25T15:46:45+5:302023-10-25T15:46:56+5:30
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद
चंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील कृषिपंपांना दोन महिन्यांसाठी दिवसाचे १२ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. दरम्यान, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
कृषिपंपांना सध्या नियमित विजेची गरज आहे. शेतात धान पीक उभे असून, पिकांनाही पाण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात जायला अडचण निर्माण होते. गडचिरोली हा नक्षल प्रभावी जिल्हा असल्याने वीजपुरवठा दिवसा होणे गरजेचे आहे, ही बाब ना. मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. चंद्रपूर व वर्धा हे दोन्ही विदर्भातील महत्त्वाचे जिल्हे आहेत. दोन महिने या तीनही जिल्ह्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करावा, अशी आग्रही मागणी मंत्री मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री फडणवीस यांच्याकडे केली. त्यांच्या या मागणीला ऊर्जामंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विदर्भातील तीन जिल्ह्यांना सुरळीत वीजपुरवठा कसा करता येईल, यासंदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी ऊर्जामंत्री फडणवीस यांनी दिली.