नागभीडच्या विद्युत व्यवस्थेत सुधारणा हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:26 AM2021-03-21T04:26:41+5:302021-03-21T04:26:41+5:30
नागभीड: नागभीड नगर परिषद स्थापन होऊन आता पाच वर्षाचा कालावधी होत असला तरी येथील विद्युत व्यवस्थेत सुधारणा झाली नाही. ...
नागभीड: नागभीड नगर परिषद स्थापन होऊन आता पाच वर्षाचा कालावधी होत असला तरी येथील विद्युत व्यवस्थेत सुधारणा झाली नाही. ग्राम पंचायतीच्या काळात जशी विद्युत व्यवस्था होती, तशीच आताही आहे. नगर परिषदेने या व्यवस्थेत सुधारणा करावी,अशी मागणी आहे.
कोणत्याही शहराची ओळख ही तेथील विद्युत व्यवस्था कशी आहे, रस्ते कसे आहेत आणि नागरिकांना पाणी कसे उपलब्ध होते, यावरून तयार होत असते. नागभीड येथे रस्ते व नाल्या निर्माणाधिन आहेत. पाण्याबाबत विचार केला तर सद्यस्थितीत तपाळ पाणी पुरवठा योजनेत फार बिघाड निर्माण होत नसल्याने पाणी समस्या तेवढी जाणवत नसली तरी येथील उंचावरील भागात बरोबर पाणी मिळत नसल्याची ओरड आहे.
नागभीड हे तालुक्याचे मुख्यालय आहे. शिवाय या ठिकाणी नगर परिषद असल्याने खेड्यापाड्यातील नागरिकांच्या नजरा साहजिकच नागभीडकडे लागून असतात. येथे वीज वितरण कंपनीने नागभीडच्या गल्लीबोळात स्ट्रीट लाईटच्या पोलचे जाळे विनले आहेत. आता या पोलवर लाईट लावण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. नागभीड नगर परिषद आपली ही जबाबदारी इमानेइतबारे पारही पाडत आहे. नागभीड नगर परिषदेने नुकतेच विद्युत पोलवर २०४३ बल्ब लावल्याची माहिती संबंधित यंत्रणेने दिली. पण हे लाईट एवढे लो पाँवर व कमजोर आहेत की या लाईटचा प्रकाश खांबापासून १० फुटाच्या समोर जात नाही. नागभीडच्या प्रमुख रस्त्यांनी नुसता फेरफटका मारला तरी याची प्रचिती येते. संबंध नागभीड शहरात हीच अवस्था आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणेस विचारणा केली असता, विद्युत व्यवस्थेसाठी लावण्यात आलेले विद्युत पोल कमी उंचीचे असल्याने ही समस्या उदभवत असल्याची माहिती दिली.