पीपीई किटने अर्ध्या तासातच होते घामाघूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:13+5:302021-04-09T04:30:13+5:30
चंद्रपूर जिल्हा प्रदूषणासाठी कुप्रसिद्ध आहे. येथील तापमान देशपातळीवर अव्वल असते. कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत ...
चंद्रपूर जिल्हा प्रदूषणासाठी कुप्रसिद्ध आहे. येथील तापमान देशपातळीवर अव्वल असते. कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी पीपीई किट घालत असतात. परंतु, चंद्रपूरचे दररोजचे तापमान ४५ अंशावर दिसून येत आहे. या तापमानात कोरोना रुग्णांवर उपचार करणारे कर्मचारी पीपीई किट घालून वावरतात. त्यामुळे ते अर्ध्या तासातच घामाघूम होतात. परिणामी गर्मी व उकाड्याचा त्यांना सामना करावा लागतो. एकतर कोरोनाची दहशत त्यातही गर्मीने कासावीस होणार जीव सांभाळताना आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे.
बॉक्स
पीपीई किट घातल्याने मोठ्या प्रमाणात गर्मी होते. कोरोनाबाधितांच्या संपर्कात राहत असल्याने पीपीई किट घातली नाही, तर कोरोना होण्याची भीती सतावत असते. बहुतेकदा शरीरातून घामाच्या धारा वाहत असतात. परंतु, रुग्णांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य असल्याने सेवा बजावत असतो.
- परिचारिका
-------
पीपीई किट घातल्यानंतर शरीरावर एक प्रकारचा भार आल्याचे भासत असते. त्यातच चंद्रपूरमध्ये असलेल्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात गरम होत असते. मागील काही दिवसांपासून स्कीनची समस्या उद्भवत आहे.
---- परिचारिका
-----
साधे जाड कपडे घातले तरी गरम होत असते. त्यातच संपूर्ण अंगभर पीपीई किट असल्याने शरीर घामाघूम होत असते. परंतु, दुसऱ्या पर्याय नसल्याने पीपीई किट घालवी लागते. - आरोग्य कर्मचारी
-----
शासनाच्या मानकाप्रमाणेच ९० जीएसएमच्या पीपीई किट कर्मचाऱ्यांना वापरण्यास देण्यात येत आहेत. कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किटशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु, कर्मचाऱ्यांना अडचण होऊ नये म्हणून शिफ्टवाइज ड्यूटी लावण्यात येत आहेत. पूर्वी आठ-आठ तासाच्या शिफ्ट असायचा आता दीड ते दोन तासात शिफ्टवाईज ड्यूटी लावण्यात येत आहे.
- डॉ. आविष्कार खांडरे, मनपा वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर