संत रविदासांच्या विचारांचे आचरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:44 AM2019-07-28T00:44:05+5:302019-07-28T00:44:48+5:30
कोणत्याही जातीपातीचा भेदभाव न ठेवता विकासाकरिता सदैव काम केले. संत रविदासांच्या मानवतेच्या विचारानुसार सर्वांनी एकमेकांशी सहकार्याच्या भावनेने माणूस म्हणून वागावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोणत्याही जातीपातीचा भेदभाव न ठेवता विकासाकरिता सदैव काम केले. संत रविदासांच्या मानवतेच्या विचारानुसार सर्वांनी एकमेकांशी सहकार्याच्या भावनेने माणूस म्हणून वागावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर शहरातील वार्ड क्रमांक ३ येथील संत रविदास प्रवेशद्वार व अंगणवाडी इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, वार्ड क्रमांक ३ मध्ये ३० ते ३५ वर्षांपासून जिल्ह्यातील नागरिक वास्तव्यास होते. परंतु जमिनीबाबतच्या वादामुळे यांना बेघर होण्याची पाळी आली होती. ही अडचण सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक बाबींमुळे अडचण जात होती. त्यामुळे न्यायालयात या जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना लोकांची घरे बरबाद होऊ नये, कुटुंब उद्धवस्त होऊ नये याकरिता जमीन संपादित करून मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय पारित केला. तसेच जमीन संपादनासाठी २६ कोटी ८६ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली.
यावेळी ना. मुनगंटीवार यांनी विविध कामांचे उद्घाटन तथा लोकार्पण केले. त्यामध्ये १४ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत वार्ड क्रमांक ३ मधील अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण, दूर्गापूर वार्ड क्रमांक ४ येथे १५ लाख रुपये खर्चून व्यायाम शाळा, विहार सभागृह, कब्रस्तान विकास कामाचे उद्घाटन, खुल्या जागेच्या विकासाकरिता ४० लाख रुपये किंमतीचे बांधकाम, दुर्गापूर सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम, छटपूजा स्थानांतर सभागृहाचे बांधकामाचे उद्घाटन पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संचालक मंडळाचे अध्यक्ष रामपाल सिंह, प्रमोद कडू, पंचायत समिती सदस्य हेमा रायपुरे, रोशनी पठाण उपस्थित होते.