प्रधानमंत्री आवास योजना मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:29 AM2018-09-13T00:29:54+5:302018-09-13T00:32:26+5:30
जिल्ह्यातील सूचिबद्ध झोपडपट्टी धारकांमधील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय नागरिकांना मोफत पट्टे वाटप करून प्रधानमंत्राी आवास योजना मार्गी लावण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील सूचिबद्ध झोपडपट्टी धारकांमधील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय नागरिकांना मोफत पट्टे वाटप करून प्रधानमंत्राी आवास योजना मार्गी लावण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
स्थानिक विश्रामगृह येथे प्रधानमंत्री आवास योजना आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांना सूचना करताना खा. अहीर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी त्याच्या मालकीची जागा ही मोठी समस्या उद्भवत आहे. त्यामुळे ही योजना पाहिजे त्या गतीने जिल्ह्यात सुरू नाही. यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील वर्तमान शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय पट्टेधारकांना मोफत पट्टे देण्याचे धोरण आहे. त्यामुळे जे झोपडपट्टीधारक सुचीबध्द आहेत अशांना मोफत जमीनपट्टे वाटप करण्याची कार्यवाही जिल्हाधिकाºयांनी त्वरित करावी, असे निर्देश दिले. याप्रसंगी आ. नाना श्यामकुळे यांनी शहरात १४ झोपडपट्या सुचीबध्द असून त्यांना मोफत पट्टे वाटप केल्यास प्रधानमंत्री आवास योजना प्रभावी गतीने मार्गी लागेल हे निदर्शनास आणून दिले. यावर मनपा आयक्तांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पट्टे वाटपाचे प्रकरण निकाली लावण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी खेमकर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये स्वमालकीची जमीन ही मोठी समस्या असल्याने जिल्ह्यातील सुचीबध्द झोपडपट्टयांचे प्रकरण तात्काळ जिल्हास्तरावर मागवून घेण्याचे व पट्टे देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
या विषयांवर पुढील १५ दिवसांत सभा घेण्यात येणार आहे. तोपर्यंत पट्टे वाटपाची समस्या निकाली काढावे, या सभेत किती प्रकरणे निकाली निघाली याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व अधिकाºयांनी तत्परतेने कामे करावे, असे निर्देश देण्यात आले.