प्रधानमंत्री मुद्रा योजना स्वयंरोजगारासाठी वरदान
By Admin | Published: October 4, 2015 01:45 AM2015-10-04T01:45:49+5:302015-10-04T01:45:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली महत्वाकांक्षी प्रधानमंत्री मुद्रा योजना स्वयंरोजगारासाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन वित्त,
मुनगंटीवार : महाकर्ज वितरण सोहळा
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली महत्वाकांक्षी प्रधानमंत्री मुद्रा योजना स्वयंरोजगारासाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा प्रशासन व जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने आयोजित महाकर्ज वितरण सोहळयात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर होते. महापौर राखी कंचलार्वार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुबेसिंग, बँक अधिकारी अरविंद शर्मा, महेंद्र वाही व मधुसूदन रुंगठा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गरीब व्यक्ती कर्जाची परतफेड हमखास करतो, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वितरीत केलेल्या तरुणांना बँकांनी प्रशिक्षीत करावे. केवळ उद्दिष्टपूतीसाठी व कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी योजना न राबविता खऱ्या लाभार्थ्यांना लाभ होईल, याची दक्षता घ्यावी. रोजगार मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण रोजगार देणाऱ्यांची संख्या वाढत नाही. हे चित्र बदलले पाहिजे असे ते म्हणाले. बेरोजगारी कमी करण्याचा गेम चेंजर मुद्रा बँक ठरु शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्र मुद्रा बँकेशी लिंकअप करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. मुद्रा बँकेला अजून सुक्ष्म वित्त पुरवठा योजना राबविली जाईल, असे ते म्हणाले. लहान लहान उद्योग मोठे झाले पाहिजे, हा मुद्रा बँकेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील बेरोजगार युवकांना कर्ज पुरवठा करुन देशातच उत्पादकता वाढवून कौशल्यवान पिढी निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना अतिशय उपयुक्त कार्यक्रम ठरणार असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत शिशु योजना ५० हजार रुपयापर्यंत, किशोर योजना ५० हजार ते ५ लाखापर्यंत व तरुण योजना ५ लाख ते १० लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. उद्योगातील यशस्विता व उद्योगशीलता पाहून वरील तीन टप्प्यात बँका कर्ज वाटप करणार आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले.