राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकाची प्रताडना
By admin | Published: August 23, 2014 11:53 PM2014-08-23T23:53:35+5:302014-08-23T23:53:35+5:30
चिमूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकाला सेवा पुस्तक अपडेट करण्यासाठी वर्षभरापासून चकरा माराव्या लागत आहे. लालफितशाई प्रशासनामुळे
खडसंगी : चिमूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकाला सेवा पुस्तक अपडेट करण्यासाठी वर्षभरापासून चकरा माराव्या लागत आहे. लालफितशाई प्रशासनामुळे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक ना.रा. कांबळे यांच्यावर ही वेळ आली आहे.
चिमूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बाम्हणी येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक ना.रा. कांबळे यांना सन २०१४ मध्ये राज्य शासनाच्या वतीने राज्य पुरस्कार देवून गौरवण्यात आले. एकीकडे चांगल्या कामाची दखल शासनाकडून घेतली गेली. तर दुसरीकडे मात्र जिल्हा प्रशासनाच्या कारभारामुळे या शिक्षकाला सेवा एक मधील नोंद अप्डेट करण्यासाठी जिल्हा परिषदेत हेलपाटे मारावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नारायण कांबळे यांची उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झाल्याने त्यांना एक वेतन वाढ मिळणे आवश्यक आहे. याकरिता सेवा पुस्तकात तशा नोंदी करून सेवा पुस्तक अपडेट असणे गरजेचे आहे. या अनुषंगाने कांबळे यांनी एक ते दिड वर्षापूर्वी पंचायत समिती चिमूर मार्फत सेवा पुस्तकात नोंदी करून जिल्हा परिषदेला पाठविले. तेव्हा संबंधित लिपीकाने सेवा पुस्तकात त्रृटी आहेत. असा शेरा मारून पुस्तक परत पाठविले. मात्र नंतर त्रृटी पूर्ण करून पाठविले तरीही तिसऱ्यांदाही चुकीच्या तारखा दर्शवून परत पाठविले.
तिसऱ्यांदा सेवा पुस्तक परत पाठविताना ज्या त्रृटी दाखविल्या त्या त्रृटीशी सेवा पुस्तकाचा संबंध येत नाही. यामध्ये मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे ८ डिसेंबर २०१० ला कुठलेच पत्र मिळाले नाही तर ते पत्र ४ डिसेंबर २००८ ला मिळाले व त्याची सेवा पुस्तकात नोंद आहे. या प्रमाणपत्राची वेतन पडताळणीसाठी गरज नाही. माझी पदस्थापना नसून पदोन्नती आहे. त्यामुळे एक वेतन देणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कारभारामुळे हा गैरप्रकार घडत असून माझ्यासारख्या अनेक शिक्षकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे कांबळे यांचे म्हणणे आहे.
सेवा पुस्तकात नोंदी दुरूस्त न केल्याने मला आर्थिक लाभापासून वंचित राहावे लागत आहे. या बाबुगिरीवर वेळीच लगाम लावून शिक्षकांना होणारा त्रास दूर करावा. अशी मागणीही कांबळे यांनी केली आहे. वेळीच सेवा पुस्तक अपडेट न झाल्यास शासनाने दिलेला राज्यस्तरीय पुरस्कार शासनाला परत करावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. शिक्षण विभागाने दखल घेऊन त्वरित काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)