प्रत्येक आगारात साजरा होणार ‘प्रवासी राजा दिन’; प्रवाशांना आपल्या समस्या मांडता येणार
By परिमल डोहणे | Updated: July 10, 2024 20:56 IST2024-07-10T20:55:59+5:302024-07-10T20:56:20+5:30
लालपरीने प्रवास करताना प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, या समस्या कुणापुढे मांडायच्या, याबाबत प्रवाशांना अडचण असते...

प्रत्येक आगारात साजरा होणार ‘प्रवासी राजा दिन’; प्रवाशांना आपल्या समस्या मांडता येणार
चंद्रपूर : प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात (डेपो) दर सोमवारी व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ साजरा करण्यात येणार आहे. १५ जुलैपासून चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ होणार आहे. प्रवासी राजादिनी प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात मांडू शकणार आहेत.
लालपरीने प्रवास करताना प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, या समस्या कुणापुढे मांडायच्या, याबाबत प्रवाशांना अडचण असते. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण होऊ शकत नाही. मात्र, आता प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रवासी राजादिनी प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात मांडू शकणार आहेत. या दिवशी एसटीच्या विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
रा. प. कर्मचाऱ्यांसाठी कामगार पालक दिन
राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे आगार पातळीवरच निराकरण करण्याकरिता १५ जुलैपासून चंद्रपूर विभागातील प्रत्येक आगारात सोमवारी कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विभाग नियंत्रक, संबंधित आगार व्यवस्थापक यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी रा. प. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील चारही आगारांत आळीपाळीने प्रत्येक सोमवारी सकाळी १० ते २ या वेळेत प्रवासी राजा दिन तर ३ ते ५ या वेळेत कामगार पालक दिनाचे आयोजन केले जाणार आहे. तसे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रवासी राजादिनी प्रवासी आपल्या समस्या मांडू शकतात. सूचनाही महामंडळाला देऊ शकणार आहे. समस्या सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे.
-स्मिता सुतवणे, विभाग नियंत्रक, चंद्रपूर