सुख-शांतीसाठी केली प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:13 AM2019-06-06T00:13:32+5:302019-06-06T00:14:20+5:30
रमजानच्या पवित्र पार्श्वभूमीवर एक महिना रोजा ठेवल्यानंतर आज बुधवारी रमजान ईदनिमित्त चंद्रपूरसह जिल्ह्यातील विविध मशीदमध्ये मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केला. देशात सुख, शांती नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रमजानच्या पवित्र पार्श्वभूमीवर एक महिना रोजा ठेवल्यानंतर आज बुधवारी रमजान ईदनिमित्त चंद्रपूरसह जिल्ह्यातील विविध मशीदमध्ये मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केला. देशात सुख, शांती नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.
चंद्रपुरातील पठाणपुरा वार्डातील आलमरी ईदगाह, जनता महाविद्यालयाच्या पटांगणावरील लष्करी ईदगाह व बगड खिडकी परिसरातील शाही गुप्त मशीद परिसरात सकाळी मुस्लीम बांधवांनी उपस्थित राहून नमाज अदा केला. यावेळी युवक व लहान मुलांचीही लक्षणीय उपस्थिती होती. या ईदगाह परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. सर्वत्र अत्तराचा सुगंध दरवळत होता.
जनता महाविद्यालयाच्या पटांगणावरील लष्करी ईदगाह येथे छोटी मस्जिद पब्लिक ट्रस्ट कमिटीच्या वतीने नमाजसाठी विशेष आयोजन करण्यात आले होते.
मौलाना पेश इमाम मुफ्तीवली उल्लाह यांनी सर्व उपस्थित मुस्लीम बांधवांना नमाजसाठी दीक्षा दिली. सकाळी ८.४५ वाजता नमाजला सुरुवात करण्यात आली. ९.३० वाजेपर्यंत येथे नमाज अदा करणे सुरू होते. यावेळी कमिटीचे अध्यक्ष अनवर खान, सचिव साबीर, इनायत तुल्ला, इजहार काझी, बाबाभाई अब्दुल रहमान, हाजी मोहम्मद इकबाल, जहीर काझी, इब्राहीमभाई व कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
एकमेकांना शुभेच्छा
दरगाह व मशीदमध्ये नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लीम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच हिंदू बांधवांनीसुध्दा मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, लष्करी ईदगाह येथे महापौर अंजली घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
जिल्हाभरात उत्साह
चंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुरी येथेही रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. भद्रावती येथे नवनिर्वाचित खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनीही मशीदमध्ये जाऊन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.