शस्त्रक्रिया केल्यानंतरही झाली गर्भधारणा
By Admin | Published: July 15, 2015 01:07 AM2015-07-15T01:07:12+5:302015-07-15T01:07:12+5:30
गर्भधारणा टाळण्यासाठी कुटूंब कल्याणची शस्त्रक्रिया केली जाते. मात्र शस्त्रक्रिया केल्यानंतरही मूल तालुक्यातील बोरचांदली येथील एका महिलेला गर्भधारणा झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
मूल : गर्भधारणा टाळण्यासाठी कुटूंब कल्याणची शस्त्रक्रिया केली जाते. मात्र शस्त्रक्रिया केल्यानंतरही मूल तालुक्यातील बोरचांदली येथील एका महिलेला गर्भधारणा झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. वैद्यकीय विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. मूल तालुक्यातील बोरचांदी येथील एका महिलेला १ जून २०१३ ला तिसरे अपत्य झाले. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी तिने २६ सप्टेंबर २०१३ ला प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेतली.
मागील आठवड्यात सदर महिलेने राजगड येथील आयुर्वेदिक रुग्णालयात तपासणी केली असता, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला गर्भधारणेची शंका आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यासाठी पाठविले. १ जुलैला गर्भधारणेबाबत तपासणी करण्यासाठी सोनोग्राफी काढण्यात आली असता, सदर महिला दोन महिन्याची गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यामुळे ती महिला हादरूनच गेली. वैद्यकीय विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे गर्भधारणा झाल्याचा आरोप यावेळी त्या महिलेने केला. याबाबत न्याय द्यावा, अशी मागणी तिने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
सदर महिलेची शस्त्रक्रिया करताना ट्युब चिकटकलेली असल्यामुळे ती पोकळ राहिली असावी. क्वचित प्रसंगी असा प्रकार घडू शकतो. शस्त्रक्रिया केलेल्या ट्युबमध्ये काही काळानंतर पोकळी निर्माण होऊ शकते. याबाबत केसचा अभ्यास करून पर्यायी मार्ग शोधावा लागेल.
- डॉ.सुधीर मेश्राम
तालुका वैद्यकीय अधिकारी मूल