आरोग्य केंद्राच्या आवारात शिरले रानडुक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:51 PM2019-05-27T22:51:35+5:302019-05-27T22:51:50+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास रानडुक्कर शिरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिसी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास रानडुक्कर शिरले. गावकऱ्यांच्या मदतीने, चार तासांच्या प्रयत्नानंतर रानडुकराला पकडण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले.
रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे प्राथमिक अरोग्य केंद्र बंद होते. आवरही सुनसान होते. दुपारच्या उन्हातून वाचण्यासाठी, झाडाच्या सावलीचा आश्रय घेण्यासाठी किंवा पाण्याच्या शोधात रानडुक्कर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात शिरले असावे. रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांचे या रानडुकरावर लक्ष पडले. लगेच ही बातमी गावात पसरली. शेकडो गावकरी रानडुकराला बघण्यासाठी गोळा झाले. दरम्यान वनविभागालाही सूचना देण्यात आली. तब्बल चार तास डुकराला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. शेवटी गावकºयांच्या मदतीने जाळी लावून रानडुकराला पकडण्यात आले.
याआधीही जंगलातून शिकारीच्या शोधात वाघ, तसेच अन्न आणि पाण्याच्या शोधात इतर जंगली जनावरे गावात व शिवारात अनेकदा आले होते. परंतु जीवहानी झाली नाही. शेतातली उभी पीक रानडुकरे उद्ध्वस्त करतात. त्यामुळे पिकाचे नुकसान होते.