महाकाली यात्रेसाठी जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:00 PM2018-03-18T23:00:18+5:302018-03-18T23:00:18+5:30
शहरात दरवर्षी चैत्र पोर्णिमेला चंद्रपूरची आराध्य देवता ऐतिहासीक महाकाली मंदिर परिसरात भव्य यात्रा भरते. यंदा २३ मार्चपासून यात्रा सुरू होणार असून २ एप्रिलला समारोप होईल.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर: शहरात दरवर्षी चैत्र पोर्णिमेला चंद्रपूरची आराध्य देवता ऐतिहासीक महाकाली मंदिर परिसरात भव्य यात्रा भरते. यंदा २३ मार्चपासून यात्रा सुरू होणार असून २ एप्रिलला समारोप होईल. राज्यभरातून येणाºया हजारो भाविकांना मूलभूत सोईसुविधा मिळाव्यात आणि कायदा व सुव्यवस्था चोख राहावी, यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन समितीची बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
यावेळी पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मनपाचे आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नाईक, महाकाली मंदिराचे विश्वस्त सुनील महाकाले, मुख्य पुजारी गजानन चन्ने, मुरली मनोहर व्यासउपस्थित होते.
भक्तांच्या निवासाच्या दृष्टीने मंदिराच्या आतील परिसरात दोन मोठे लोखंडी शेड तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी एक धर्मशाळेच्या समोरील विभागात तर दुसरा मंदिराच्या समोर उभारण्यात आला आहे. या व्यतिरिक्त मंदिराच्या आतील भागात ताडपत्रीचे मंडपही उभारण्यात आल्याची माहिती मंदिराच्या वतीने बैठकीत देण्यात आली. मंदिर परिसरातील बाहेरील भागात महाकाली स्टेडियम, भक्त निवासाठी १८ हजार स्केअर फूटांचा मंडप उभारण्यात येणार आहे. पाण्याच्या टाकीच्या कामामुळे मंडपाकरीता जागा कमी पडत आहे. त्यामुळे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. बैलबाजार परिसरात भक्त निवासासाठी महानगर पालिका व्यतिरिक्ततर्फे ६ हजार स्केअर फूटांचा मंडप उभारण्यात येणार आहे. अंचलेश्वर मंदिराच्या बाहेरील भागात देवकामाच्या पोव्याकरिता ताडपत्रीचा मंडप भोजनाकरिता व तीन हजार स्केअर फूटचा कापडी निवासाकरिता उभारण्यात येईल. दर्शन रांगेची व्यवस्थेसाठी ६ हजार स्केअर फूटचा शेड तयार करण्यात आला आहे. याशिवाय १२ हजार स्केअर फूटाचा मंडप उभारण्यात येईल. भाविकांच्या रांगेत मजबूत रेलींग, पिण्याच्या पाणी, पंख्यांची सोय केली जाणार आहे. भक्तांसाठी मंदिर परिसरात थंडावा राहावा, यासाठी फॅगर सिस्टम तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे रेड क्रॉसिंगला अडचण होत नाही. मंदिराचा परिसर मोकळा वाटतो. भक्तांच्या रांगेत चार टीव्ही व एक एलईडी स्क्रीन लावण्यात येईल. महाप्रसाद वितरणासाठी वेगळे शेड तयार करण्यात येणार आहे. महाप्रसाद वितरणाकरिता परवानगी घेण्यात आली आहे. रांगेतील दर्शनार्थीना देवस्थान आणि इतर सेवाभावी संस्थांमार्फत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येईल. यासाठी महाकाली महाप्रसाद वितरण समिती, जलाराम सेवा मंडळ, कोल कॉन्ट्रक्टर मंडळ, जैन सेवा समिती मदत करणार आहे. मंदिराच्या मालकीची तीन मजली स्वतंत्र धर्मशाळा असून प्रत्येक मजल्यावर शौचालय, बाथरुम तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नवाल यांनी केली. यात्रेदरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरातील आतील भागात डेस डक्टींग, कुलर फेस डक्टींग कुलर आणि एक्झिस्ट फॅनची व्यवस्था केली. भक्तांच्या सोईकरीता मुख्य प्रवेशद्वारावर श्रीमुख दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पोलीस अधीक्षक ठाकर यांनीही सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाची माहिती सादर केली.
पिण्याचे पाणी मुबलक मिळणार
पिण्याच्या पाण्यासाठी मंदिर परिसरात चार हजार लीटर क्षमतेचा वॉटर कुलींग प्रकल्प तयार करण्यात आला आहे. त्यावर १६ नळाचे कनेक्शन देण्यात येणार आहे. ७५ हजार लिटर क्षमतेच्या टाकीवरून दोन समर्सिबल पंप उपलब्ध करण्यात आले. त्यावरुन स्टेडीयम तसेच मंदिराच्या अधिकचे १५ नळ कनेक्शन देण्यात आले आहे. यात्रेच्या कालखंडात बैलबाजार परिसरात दरवर्षी पाणपोई लावण्यात येते. त्याकरिता महानगर पालिकेने वीज तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था
मंदिर, धर्मशाळा आणि भाविकांच्या दर्शन रांगेच्या परिसरात यंदा जादा सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. महाकाली स्टेडियम परिसरामध्ये पोलीस चौकी उभारण्यात येणार असून मंडपात ३७ लाऊड स्पीकरची व्यवस्था केली जाणार आहे. महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्रात देवस्थान कमिटीकडून औषधीसाठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनुचित घटना घडू नये, यासाठी १५ फायर सिलेंडरची व्यवस्था केली असून पोलीस प्रशासनाच्या मदतीने गस्त पथक व स्वयंसेवकांची नियुक्ती होणार आहे.