हिटवेव्हसाठी ॲक्शन प्लॅन तयार करा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना
By साईनाथ कुचनकार | Published: April 27, 2023 03:10 PM2023-04-27T15:10:09+5:302023-04-27T15:12:00+5:30
उष्माघातामुळे दरवर्षी अनेकजणांचा मृत्यू
चंद्रपूर : राज्यातच नव्हे तर देशात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चंद्रपूरचे तापमान अधिक असते. मागील काही वर्षांमध्ये उष्माघाताने अनेकांचा जीव गेला आहे. अशा घटना होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जाते. दरम्यान, १२ मेनंतर येणाऱ्या हिटवेव्हसाठी ॲक्शन प्लॅन तयार करावा. उष्माघात (हिटवेव्ह) कृती आराखड्याचे योग्य नियोजन करून प्राधान्याने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अधिकाऱ्यांना दिले.
उष्माघात हा सायलेंट किलर असून, या उष्माघातामुळे दरवर्षी अनेकजण मृत्युमुखी पडतात. चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान अधिक असते. उष्माघाताच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी इमारती, रुग्णालये आदींचा आढावा घ्यावा. फायर सेफ्टीच्या बाबतीत दक्ष राहावे. शाळा, महाविद्यालये व अंगणवाडी यांचा वेळा बदलविण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, जिल्हा जलसंधारण अधिकारी नन्नावरे, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.