वृक्ष लागवडीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By admin | Published: July 1, 2016 01:01 AM2016-07-01T01:01:23+5:302016-07-01T01:01:23+5:30

शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातही २१ लाख २० हजारांहून अधिक रोपांची १ जुलै रोजी लागवड करण्यात येत आहे.

Prepare the administrative machinery for planting trees | वृक्ष लागवडीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

वृक्ष लागवडीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Next

सामाजिक संस्थाचाही पुढाकार : आवश्यक रोपटे उपलब्ध
चंद्रपूर : शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातही २१ लाख २० हजारांहून अधिक रोपांची १ जुलै रोजी लागवड करण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद या स्थानिक संस्थेसोबतच शासनाच्या सर्व विभागाने तयारी पूर्ण केली आहे. खड्डे खोदून तयार झाले असून एकूणच वृक्ष लागवडीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ही योजना राबविण्यात येत आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग यासह विविध शासकीय कार्यालयांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. याशिवाय विविध खाजगी, सामाजिक संस्थाही मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करणार आहे. येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळाने ५६ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला असून ते संपूर्ण तयारीसह सज्ज झाले आहे.
वातावरण निर्मितीसाठी अनेकांनी आज गुरुवारी ठिकठिकाणी रॅली व वृक्षदिंडीचे आयोजन केले. चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी शहरातून रॅली काढली. यात महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय इंगोले यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते. या रॅलीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग होता. वृक्षांचे महत्त्व सांगणारे बॅनर, स्लोगन लोकांचे लक्ष वेधून घेत होते.
नॅशनल एज्युकेशन सोसायटी रामनगर, चंद्रपूरद्वारा संचालित नॅशनल गर्ल्स हायस्कूल उर्जानगर व नॅशनल उच्च प्राथमिक शाळा, उर्जानगर यांच्या वतीने वृक्षलागवडीसंदर्भात जनतेत जनजागृती करण्यासाठी वृक्षदिंडी काढण्यात आली. समतानगर, कोंढी, नेरी, दुर्गापूर या परिसरात वृक्षदिंडी फिरवून वृक्ष लावण्याचा संदेश देण्यात आला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक रमा वाघमारे, शुभांगी तांबोळी, यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात सहा हजार ५६३ रोपे लावण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी बिपुल जाधव यांनी गुरुवारी पंचायत समिती स्तरावर या कार्याचा आढावा घेतला. यावेळी पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला बोबाटे, उपसभापती अनकेश्वर मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे संवर्ग विकास अधिकारी भुजंग गजभे आदी उपस्थित होते. यासोबत जास्तीत जास्त नागरिकांनी वृक्ष लागवडीत सहभागी व्हावे, यासाठी यावेळी नागरिकांना वृक्षांचे वितरणही करण्यात आले. विशेष म्हणजे, तुकूम प्रभागात केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे यांच्या नेतृत्वात १ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मातोश्री विद्यालयातून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. प्रभागात ज्या ठिकाणी वृक्ष लागवड होणार आहे, त्या ठिकाणी ही दिंडी फिरणार आहे. नगिनाबाग येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक येथे दुपारी ३ वाजता वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे. याशिवाय भद्रावती येथील निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातही १ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे. (शहर प्रतिनिधी)

पोलीस विभागाचीही तयारी पूर्ण
शासनाच्या वृक्ष लागवड योजनेला प्रतिसाद देत पोलीस विभागानेही आठ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे परिसरात १ जुलै रोजी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित ठाण्यांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. सर्व ठाण्यांनी आपली तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अध्यक्षांनी घेतला आढावा
१ जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवडीसंदर्भात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकूण तीन लाख २५ हजार ३५१ वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी खड्डेही खोदून तयार आहेत.

ट्री गार्डचे वाटप
सुभाष कासनगोट्टूवार व तुकूम प्रभागातील नागरिकांनी एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या अनुषंगाने गुरुवारी रोपांचे व त्याला लागणाऱ्या ट्री गार्डचे वाटप करण्यात आले. तुकूम परिसरातील बीजेएम कारमेल अकादमी, पवनसुत हनुमान देवस्थान ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक संघ, हिंदवी स्वराज्य मित्र मंडळ, हरित मित्र बहुउद्देशिय संस्था यांच्यासह अनेकांनी या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Web Title: Prepare the administrative machinery for planting trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.