वनऔषधी उपलब्धतेचा जिल्हा नकाशा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:38 PM2018-11-27T22:38:23+5:302018-11-27T22:38:46+5:30

जिल्ह्यातील समृद्ध जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वनऔषधी असल्याने पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने वनऔषधी उपलब्धतेचा जिल्हा नकाशा तयार केला. यामध्ये सुमारे दीडशेपेक्षा अधिक वनस्पतींची नोंद घेतली आहे.

Prepare a district map of herbal remedies | वनऔषधी उपलब्धतेचा जिल्हा नकाशा तयार

वनऔषधी उपलब्धतेचा जिल्हा नकाशा तयार

googlenewsNext
ठळक मुद्देआघारकर संशोधन संस्थेचा पुढाकार : १५० दुर्मिळ वनऔषधींची नोंद

राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील समृद्ध जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वनऔषधी असल्याने पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने वनऔषधी उपलब्धतेचा जिल्हा नकाशा तयार केला. यामध्ये सुमारे दीडशेपेक्षा अधिक वनस्पतींची नोंद घेतली आहे.
पुण्यातील आघारकर ही संस्था अनेक वर्षांपासून संशोधन क्षेत्रात मूलभूत कार्य करत आहे. राज्य शासनाने औषधी वनस्पतींचे गॅझेटियर १९५३ मध्ये प्रकाशित केले. या गॅझेटकरिता डॉ. एस. पी. आघारकर यांनी पुढाकार घेतला होता. यामध्ये राज्यातील ३०० वनऔषधींची नोंद आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्याच वनस्पतींची माहिती यामध्ये येऊ शकली नाही. त्यामुळे या संस्थेने राज्यातील काही जिल्ह्यांसोबतच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश करून संशोधन केले. संशोधन व सर्वेक्षणानुसार ४०० वनऔषधींची नोंद झाली. व्यावसायिक उपयुक्ततेसाठी ३५७ वनस्पतींची मागणी वाढत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले. वनऔषधींची माहिती संकलनासाठी जैवविविधता मंडळ, वनविभाग आणि औषध निर्मिती क्षेत्रातील काही संस्थांचेही सहकार्य घेण्यात आले. जिल्ह्यामध्ये ताडोबासारखे समृद्ध जंगल आहे. मागील पाच वर्षांपासून जंगलाचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली.
राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. परिणामी, जिल्ह्यातील जैवविविधता वाढली. अनेक दुर्मिळ वनस्पती जोमाने बहरल्या आहेत. यातील बहुतेक वनस्पती बहुगुणी औषधीयुक्त आहेत. वनऔषधींची तांत्रिक नोंद करण्यासाठी डॉ. व्ही. एन. नाईक, डॉ. मुजुमदार, डॉ. दिवाकर, डॉ. चाफेकर, डॉ. चिंचणीकर अशा पाच तज्ज्ञांची मार्गदर्शक समिती गठित करण्यात आली होती. संस्थेचा हा अहवाल संशोधनासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
वनस्पतींची करावी व्यावसायिक लागवड
जिल्ह्यातील वनस्पतींचे वर्णन, शास्त्रीय माहिती, औषधी वापर, लागवड आणि उत्पादनाचे तंत्र यासंदर्भातही पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने माहिती संकलित केली. काही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये ‘सर्पगंधा’ या वनस्पतीचा समावेश आहे. ‘काळमेघ’ ही वनस्पती दुर्मिळ असून व्यावसायिक लागवडीसाठी चालणा देण्याची गरज असल्याचेही निरीक्षण संस्थेने नोंदविले आहे.

Web Title: Prepare a district map of herbal remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.