श्रींच्या निरोपासाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:52 PM2017-09-04T22:52:56+5:302017-09-04T22:53:32+5:30

१२ दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी भव्य मिरवणुकीद्वारे गणरायाला निरोप दिला जाणार आहे.

Prepare the mechanism for recreating Shree | श्रींच्या निरोपासाठी यंत्रणा सज्ज

श्रींच्या निरोपासाठी यंत्रणा सज्ज

Next
ठळक मुद्देमिरवणुकीवर नजर : पोलीस, मनपा व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : १२ दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी भव्य मिरवणुकीद्वारे गणरायाला निरोप दिला जाणार आहे. या मिरवणुकीसाठी पोलीस विभाग आणि महानगरपालिका व जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे. यादरम्यान कुठलीही अनूचित घटना घडू नये, यासाठी पोलीस विभागाने बाहेर जिल्ह्यातूनही अतिरिक्त कुमक बोलाविली आहे. रामाळा व दाताळा मार्गावरील इरईचे पात्र हे विसर्जनस्थळ असल्याने तिथे विजेची व्यवस्था, स्वच्छता, निर्माल्यकुंड व कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
२५ आॅगस्ट रोजी मोठ्या उत्साहात जिल्हाभर गणरायाची स्थापना करण्यात आली. चंद्रपूर शहरात शंभराहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री ची स्थापना केली. यंदा तब्बल १२ दिवस लाडका गणराया नागरिकांच्या घरोघरी व वॉर्डावॉर्डात असल्याने सर्वत्र भक्तीचे वातावरण पसरले होते. मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. यावेळी गणरायाला निरोप दिला जाणार आहे. दाताळा मार्गावरील इरई नदीचे पात्र व रामाळा तलाव हे चंद्रपुरातील विसर्जनस्थळ आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या स्थळांची स्वच्छता केली असून त्या ठिकाणी कृत्रिम तलाव, निर्माल्य कुंड व आपातकालीन व्यवस्थेसाठी विसर्जनस्थळीच मंडप उभारले आहे.
जिल्हा प्रशासनानेही सर्व तयारी केली असून विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मचानी उभारण्यात आल्या आहेत. गांधी चौकात व जटपुरा गेटवरून मिरवणुकीतील गणेशमूर्तीवर फुलांचा वर्षाव केला जातो. याचीही तयारी पूर्ण झाली आहे.
वाहतुकीत बदल
गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत मुख्य मार्गावरुन निघणाºया मिरवणूकी दरम्यान वाहतुकीची कोंडी होवू नये तसेच मिरवणूक शांततेत व सुव्यवस्थेत होवून रहदारी सुरळीत राहावी, यासाठी चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत पोलीस प्रशासनाने बदल केले आहे. विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीकरिता शहरातील गल्ल्यांचा वापर करावा, जडवाहनांनी शहराच्या बाहेरील मार्गाने वाहतूक करावी, ५ सप्टेंबरला सकाळी ७ वाजेपासून ६ सप्टेंबरला सकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांनी पार्किंग स्थळ घोषित केलेल्या ठिकाणीच आपली वाहने उभी करावी, गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूक कार्यक्रमामुळे कस्तुरबा रोड, रामाळा तलाव, प्रियदर्शनी चौक, अंचलेश्वर गेट, बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, जोड देऊळ, मौलाना आझाद गार्डन हे परिसर व यातील चौक नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच चांदा क्लब ग्राउंड, डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वरोरा नाका, सेंट मायकल हायस्कूल नगीनाबाग, सिंधी पंचायत भवन संत केवलराम चौक रामनगर, व्यायाम शाळा ग्राऊंड पठाणपूरा चौक, डीएड कॉलेज ग्राऊंड बाबूपेठ, महाकाली मंदिर ग्राउंड, बागला चौक या ठिकाणी नागरिकांनी आपले वाहने पार्किंग करावेत. तसेच ज्युबली हायस्कुल पटांगण व महानगरपालिकेच्या बाजूला असलेल्या ठिकाणी वाहने पार्किंग करता येणार आहेत. मात्र मिरवणूक संपल्यानंतरच ही वाहने येथून काढावी लागणार आहेत.
असा आहे पोलीस बंदोबस्त
पोलीस विभागाने बंदोबस्ताकरिता एक अप्पर पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपअधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, ६१ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ८०० पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रक पथक, नक्षल विरोधी अभियान पथके, २०० गृहरक्षक आणि २०० पोलीस मित्रांनाही सज्ज केले आहे. ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याकरिता ध्वनी प्रदूषण प्रतिबंध पथके आवश्यक यंत्रणेसह नेमण्यात आले आहे.
यंदा डीजेमुक्त मिरवणूक
विसर्जन मिरवणूक म्हटली की डिजेच्या कर्णकर्कश आवाजाचीच छातीत धडकी भरते. मात्र यावर्षीपासून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच विसर्जन मिरवणूक डीजेमुक्त दिसणार आहे. या मिरवणुकीत पुन्हा पारंपरिक वाद्यांना स्थान मिळणार आहे.
१०६ सीसीटीव्ही कॅमेरे
गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभागाने शहरात १०६ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. यातील सर्व सिस्टम अद्यावत करण्यात आली आहे. प्रत्येक चौकात आणि वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही व ४० हॅन्डीकॅमेराद्वारे मिरवणुकीवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. यासोबतच ११ हायटेक कॅमेरेही सज्ज असून ड्रोन कॅमेराद्वारे अतिसुक्ष्म निगरानी ठेवली जाणार आहे.

Web Title: Prepare the mechanism for recreating Shree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.