गडबोरीत बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी शुटर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:01 AM2019-06-10T00:01:02+5:302019-06-10T00:01:59+5:30
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे. आठ दिवसात बिबट्याने घरात घुसून एक लहान बालक स्वराज व महिला गयाबाई हिला ठार केले आहे. बिबट चक्क घरात येत असल्याने गडबोरी गाव प्रचंड दहशतीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे. आठ दिवसात बिबट्याने घरात घुसून एक लहान बालक स्वराज व महिला गयाबाई हिला ठार केले आहे. बिबट चक्क घरात येत असल्याने गडबोरी गाव प्रचंड दहशतीत आहे. वनविभागाने गावासभोवताल सहा पिंजरे लावले. परंतु बिबट पिंजऱ्याला हुलकावणी देत आहे. त्यामुळे वनविभागाने आता बिबट्याला बेशुद्ध करून स्थानांतरण करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी गडबोरी गावाशेजारी दोन शुटरची तैनात केले आहे. दरम्यान, आज रविवारी सकाळी तुषार क्रिष्णाजी बोरकर यांच्या गोºह्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले.
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावाची लोकसंख्या पाच-सहा हजारांच्या आसपास आहे. गावाभोवताल चार ते पाच बिबट ठाण मांडून आहेत. यातील एका बिबट्याला वनविभागाने पिंजºयात जेरबंद केले आहे. नागरिकांचा बळी घेणारा बिबट व उर्वरित बिबट अजूनही गावपरिसरातच आहे. त्याच्या हालचाली वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. आता वनविभागाने बिबट्याला बेशुध्द करून स्थलांतरित करण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने वनविभागाचे शार्प शुटर ट्रॅक्यूलायझर गनसह गडबोरी येथे तैनात झाले आहेत. गडबोरी येथे वनविभागाने गस्तीत वाढ केली आहे. तरीही गडबोरी येथील ग्रामस्थ अजूनही बिबट्याच्या दहशतीत वावरत आहे.
पिंजºयाला हुलकावणीच
वनविभागाने गावपरिसरात सहा पिंजरे लावले आहेत. मात्र बिबट पिंजऱ्याला सातत्याने हुलकावणी देत आहे. ७ जूनला बिबट चक्क पिंजऱ्यावरून उडी मारून गेल्याचे कॅमेºयात कैद झाले. मात्र तो पिंजºयात शिरला नाही. दरम्यान, काल शनिवारी रात्री बिबट पिंजऱ्याजवळ फिरकलाही नाही. फक्त गावाशेजारी बिबट्याची डरकाळी ऐकू येत होती, असे ग्रामस्थ सांगतात.
गावातील ५० युवकांची रात्री गस्त
गेल्या आठ दिवसापासून वनविभागाची गावात गस्त सुरू आहे. आता वनविभागाने गावातील ५० युवकांचीही मदत घेतली आहे. आता हे युवकही वनकर्मचाऱ्यांसोबत रात्री गस्त घालत आहेत. तसेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षण दलसुद्धा गस्तीवर आहेत.