नांदा येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:44 PM2018-02-20T23:44:01+5:302018-02-20T23:44:20+5:30
कोरपना तालुका डोंगराळ व आदिवासी बहुल आहे. मात्र, शेकडो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत.
आॅनलाईन लोकमत
आवाळपूर : कोरपना तालुका डोंगराळ व आदिवासी बहुल आहे. मात्र, शेकडो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यामुळे अभ्यासासाठी नांदा येथे सुसज्ज अभ्यासिका तयार करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा गावाची लोकसंख्या १५ हजार आहे. आदिवासी भागातील तालुका अशी ओळख असल्यामुळे तालुक्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन वेगळा आहे. हे चित्र बदलायला हवे. तालुक्याची काही वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीकडे विद्यार्थी आशावादी दृष्टीने पाहत आहेत. तालुक्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता युवकांनी आपली ताकद लावली आहे. सुशिक्षित बेजरोजगारीमूळे युवक त्रस्त आहेत. नोकरी मिळणे कठीण होत चालले आहे. शेतकरी दिवसरात्र मेहनत करतो. आपल्या मुलाला नोकरीवर कसा लावता येईल, याकडे लक्ष केंद्रित करतो. पण, आवश्यक सुविधा नाहीत. नांदा येथे विवेकानंद युवा मंडळाने काही दिवसांअगोदर एक वाचनालय सुरू केले होते त्या वाचनालयात आधी काही पुस्तके होती. परंतु त्यांनी एक नवी संकल्पना राबवली. आपल्या मंडळातील युवकांच्या वाढदिवसानिमित्त वाचनालयाला काही पुस्तके भेट म्हणून आशुतोष सलील यांना विवेकानंद युवा मंडळ यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. नांदा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याºया आदिवासी भागातील युवकांना नवे ज्ञान मिळावे. सुसज्ज इमारत व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. याचाच भाग म्हणून नांदा येथे स्पर्धा परीक्षेकरिता अद्ययावत अभ्यासिका उभारण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालण्यात आले. आदिवासी तालुक्यात कोणत्याही सुविधा नाहीत. स्पर्धा परीक्षेचे ग्रंथ उपलब्ध नाहीत. विद्यार्थ्यांच्या सहकार्यानेच वाचनालय चालविले जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने निधी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी विवेकानंद युवा मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम निब्रड, सतीश जमदाडे, अनिल पेंदोर, नितेश मालेकर, तृष्णा पोटले, जयश्री सोनटक्के, बाल्य धोटे, निखिल कडुकर, आशिष बावणे, अश्विनी जेणेकर, सीमा कांबळे, पूनम बोबडे, गौर सूयवंशी, मारोती गुरनुले, आदेश देवतळे, मनोज झेल, प्रशांत जोगी, निखिल कडूकर आदी पदाधिकारी उपस्थिते होते. यावेळी जिल्हाधिकारी सलिल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. वाचनालयाला मदत करू, असे आश्वासन दिले.