एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:31+5:30
शासन निर्देश व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहमतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत चालावे, वर्ग पाळीतही बदल केले जाणार आहे. १ जुलै २०२० पासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू राहतील, यासाठी दोन पाळीचे नियोजन तयार आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सकाळी ९ ते दुपारी १२ वाजतापर्यंत नववी इयत्ता व दुपारी १२ ते दुपारी ३ वाजता पर्यंत दहाव्या वर्गाच्या अध्यापनासाठी विद्यार्थ्यांना बोलविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये संभ्रम आहे. मात्र, यासंदर्भात कधीही आदेश निर्गमित होऊ शकतो हे लक्षात घेऊन चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील ३ हजार २२७ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पूर्वतयारी करून ठेवली आहे. त्याचाच भाग म्हणून एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्याचे नियोजनही केले आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने शहरात ३२ शाळा चालविल्या जातात. कोरोना लॉकडाऊनमुळे शहरातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी विविध पर्यायी उपाययोजना करून ठेवण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार १६ मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे चालू सत्रातील शिक्षण कशा प्रकारे सुरू करता येईल, यासाठी महापौर राखी कंचर्लावार, मनपा महापौर व आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात मनपा उपायुक्त गजानन बोकडे यांच्या नेतृत्वात आराखडा सज्ज ठेवण्यात आला आहे. महानगर पालिकेच्या सर्व शाळेत कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २५ जूनपर्यंत शहरातील सर्व ३२ शाळा सॅनिटायझर व फॉगिंग पूर्ण करण्यात येणार आहे. मनपा सर्व शाळेत मास्क, सॅनिटायझर, उपलब्ध करून देण्यात येईल. शुक्रवारपर्यंत सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक पोहचविण्यात येणार आहे. शिक्षकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून वर्गनिहाय पालक सभा घ्यायच्या, यासंदर्भात नियोजन पूर्ण झाले. सर्व शिक्षकांनी वर्गनिहाय विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शैक्षणिक वाटचाल सुरू राहावी, यासाठी पाठ्यपुस्तके पोहोवत आहेत. सत्र सुरू झाले तर विद्यार्थी व पालकांना कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी दिशा अॅपच्या माध्यमातून शिक्षक आठवड्यातून एक दिवस घरी जाऊन मार्गदर्शन करीत आहेत.
वर्ग पाळीत करणार बदल
शासन निर्देश व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहमतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत चालावे, वर्ग पाळीतही बदल केले जाणार आहे. १ जुलै २०२० पासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू राहतील, यासाठी दोन पाळीचे नियोजन तयार आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सकाळी ९ ते दुपारी १२ वाजतापर्यंत नववी इयत्ता व दुपारी १२ ते दुपारी ३ वाजता पर्यंत दहाव्या वर्गाच्या अध्यापनासाठी विद्यार्थ्यांना बोलविण्यात येणार आहे.
दर आठवड्यातून आरोग्य तपासणी
प्रत्येक विद्यार्थ्यांचे थर्मामिटरने तापमान मोजून नोंद घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी घरी येताना मास्क व पिण्याचे पाणी सोबत आणावे, कोणताही विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांचे साहित्य घेणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली नसल्यासरूग्णालयात उपचार करण्यात येईल किंवा शाळेत न येण्याच्या सूचना पालकांना देण्यात येईल. १५ दिवसांनी शाळा सॅनिटायझर करण्यासोबतच विद्यार्थी व शिक्षकांची एक दिवस आरोग्य तपासणी होणार आहे.
शाळा सुरू करण्याबाबत आदेश जारी झाल्यास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आराखडा तयार आहे. यामध्ये पालकांनाही सहभागी करून घेण्यासंदर्भात मनपाच्या सर्व शाळा व्यवस्थापन समित्यांची सोशल डिस्टन्सिंग पाळून शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली.
-नागेश नित, प्रशासन अधिकारी (शिक्षण) मनपा, चंद्रपूर
चंद्रपूर महानगर पालिकेतील शाळांची गुणवत्ता आता सुधारली आहे. यंदा कोरोनामुळे शाळा बंद आहेत. याही परिस्थितीत मनपाने विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद कायम ठेवला. शाळा कधी सुरू होणार, याबाबत अनिश्चितता असली तरी पालकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.
- श्रीकांत चौधरी, पालक, चंद्रपूर