जिल्हाभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:37+5:302021-06-03T04:20:37+5:30
भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राच्या माहितीनुसार, जून महिन्यात विविध भागात पाऊस बरसणार आहे. शिवाय यंदाचा मान्सून सरासरीच्या १०१ ...
भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राच्या माहितीनुसार, जून महिन्यात विविध भागात पाऊस बरसणार आहे. शिवाय यंदाचा मान्सून सरासरीच्या १०१ टक्के असेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान, पुणे वेधशाळेनेही विदर्भामध्ये पुढील चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचे असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप मशागत आणि शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यात चार दिवसांपासून दररोज सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत आहे. रात्रीचे तापमानही आता कमालीचे खाली घसरले. बुधवारी नागरिक साखरझोपेत असतानाच पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी दिली. शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाचे आगमन शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारी आहे.
बीटी कपाशीची नऊ लाख ८६ हजार पॉकिटे
जिल्ह्यात यंदा कापूस व सोयाबीन लागवड क्षेत्र वाढणार असून, कृषी विभागाने बीटी कपाशीची नऊ लाख ८६ हजार पाकिटांची मागणी कृषी संचालकांकडे नोंदविली आहे. याशिवाय भात २ हजार ८०० क्विंटल, तूर २ हजार ८०० क्विंटल, सोयाबीन ३१ हजार ४४३ क्विंटल बियाणे जिल्ह्यासाठी मागविण्यात आले. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने शेतकरी पेरणीपूर्व कामांसाठी लगबग करीत असल्याचे दिसून येत आहे.