हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘श्री’चा गोपालकाला
By admin | Published: February 12, 2017 12:34 AM2017-02-12T00:34:49+5:302017-02-12T00:36:23+5:30
मिती माद्य शुद्ध पंचमी (वसंत पंचमी) १ फेब्रुवारीपासून श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर संस्थानच्या वतीने घोडायात्रा उत्सव सुरू झाला.
नवरात्र समाप्ती : भाविकांसाठी संघटनाचे भोजनदान
चिमूर : मिती माद्य शुद्ध पंचमी (वसंत पंचमी) १ फेब्रुवारीपासून श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर संस्थानच्या वतीने घोडायात्रा उत्सव सुरू झाला. या यात्रा महोत्सवाच्या दहाव्या दिवशी शुक्रवारी दुपारी ३ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत बालाजी महाराज यांच्या उत्सवाचा गोपालकाला झाला.
अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चिमूरच्या बालाजी महाराजाची घोडारथ यात्रेला १ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली होती. ९ फेब्रुवारीला प्रसिद्ध रातघोड्याची मिरवणूक काढण्यात आली. या रात घोड्याचा क्षण आपल्या डोळ्यात भरण्यासाठी हजारो भाविक गोविंदा...गोविंदाचा जयघोष करीत मिरवणुकीत सहभागी झाले होते. नवरात्र महोत्सवाच्या समारोपाचा दिवस म्हणजे घोडा रथयात्रेचा गोपालकाला. शनिवारी बालाजी मंदिर येथे दुपारी १२ वाजता हभप विनोद खोड यांचे किर्तन करण्यात आले. किर्तनानंतर महाराजांची विधिवत आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर गोपालकाला करून हजारो बालाजी भक्तांमध्ये काल्याचे वितरण करण्यात आले. या गोपालकाल्यानंतर ९ दिवस चाललेल्या श्रीहरी बालाजी नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली. मात्र ही यात्रा महाशिवरात्रीपर्यंत चालत असते. (तालुका प्रतिनिधी)
स्वयंसेवी संस्था व दानशुराकडून भोजनदान
पंचक्रोशीतून येणाऱ्या बालाजी महाराजाच्या भक्तगणासाठी चिमूर नगरीतील स्वयंसेवी संस्था व दानशुराकडून नवीन बसस्थानक परिसरात नेहरू चौक, हनुमान मंदिर, अनुप डेकोरेशन व श्रीहरी बालाजी देवस्थान परिसरात भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली. तसेच पाणी वितरणसुद्धा करण्यात आले.