चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयाचा विकास आराखडा सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:18 AM2018-08-03T00:18:26+5:302018-08-03T00:19:17+5:30
राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समक्ष गुरूवारी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयाचा विकास आराखडा (डीपीआर) सादर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समक्ष गुरूवारी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयाचा विकास आराखडा (डीपीआर) सादर करण्यात आला. पुढील आठवड्यात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता घेऊन महाविद्यालायाच्या कामाला वेग देण्याच्या सूचना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस एस. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूरात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ५०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. ३० जुलै २०१९ पर्यंत या रुग्णालयाचा पहिला टप्पा कार्यान्वित व्हावा, यादृष्टीने रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना ना. मुनगंटीवार यांनी केल्या. चंद्रपूर व गडचिरोली हे दोन जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. गडचिरोली जिल्हा प्रधानमंत्री यांनी घोषित केलेल्या आकांक्षीत जिल्ह्यांपैकी एक आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय झाल्यास या दोन्ही जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे. रुग्णालय बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समिती म्हणून केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संबधित एचएससीसी इंडिया लि.ची निवड करण्यात आली असून सामंजस्य करार झाला असल्याची माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.