वाघाच्या मृत्यूचा अहवाल वरिष्ठांना सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:22 PM2018-02-26T23:22:54+5:302018-02-26T23:22:54+5:30
चिमूर वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या भान्सुली जंगलातील कक्ष क्रमांक पाचमध्ये वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ढाण्या वाघाला आपला जीव गमवावा लागला होता.
आॅनलाईन लोकमत
चिमूर : चिमूर वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या भान्सुली जंगलातील कक्ष क्रमांक पाचमध्ये वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ढाण्या वाघाला आपला जीव गमवावा लागला होता. या वाघाच्या मृत्यूचा अहवाल चिमूर वन विभागातर्फे वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतरच कळणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ताडोबा अधारी व्याघ्र प्रकल्पापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावरील भान्सुली जंगलात जखमी वाघ पाच दिवस एकाच ठिकाणी ठाण मांडून होता. वन विभागाने वाघाच्या सुरक्षेसाठी ४० कर्मचारी दिवसरात्र पहारा देण्यासाठी ठेवले होते. मात्र उपचाराचे अधिकार दिले नाही. त्यामुळे हे कर्मचारी घटनास्थळावर वाघाच्या मृत्यूचे मुक साक्षीदार ठरले.
वाघ जखमी असल्याचा अहवाल व फोटो व जखमी वाघावर त्वरित उपचार करण्याची गरज स्थानिक वनाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे २२ फेबुवारीलाच वर्तविली होती. मात्र याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष दिले नाही. आता या सर्व प्रकाराची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत वाघाचा शवविच्छेदन अहवाल ब्रम्हपुरी विभागीय अधिकाºयांना पाठविला असून शवविच्छेदन अहवालावरुन वाघाच्या मृत्यूचे कारण कळू शकेल. दरम्यान, फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट यायला एक ते दोन महिन्यांचा वेळ लागणार असल्याचेही वनपरिक्षेत्र अधिकारी बी.पी. चिवंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वाघाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे आता वन विभागापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे वाघाच्या रक्षणासाठी शासन करोडो रुपये खर्च करीत असताना एका ढाण्या वाघाचा असा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तो दुसरा वाघ गेला कुठे?
दोन वाघाच्या झुंजीत ‘येडा अण्णा’ नामक वाघ जखमी झाला होता, असे सांगण्यात येत आहे. तसा प्राथमिक अंदाजही वन विभागाने वर्तविला आहे. वाघाची झुंज झाली असेल तर मग दुसरा वाघही जखमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र वनविभाग अजूनही दुसऱ्या वाघाबाबत उदासीन दिसत आहे. त्याचा कुठेही शोध घेतला जात नसल्याचेच दिसून येत आहे. आता तर वन विभाग त्या दुसºया वाघाचा शोध घेऊन उपचार करेल काय, असा प्रश्न आता वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.