समायोजनसाठी शिक्षक संघटनांचा दबाव
By admin | Published: November 27, 2014 11:31 PM2014-11-27T23:31:59+5:302014-11-27T23:31:59+5:30
ज्ञान दानाचे सेवाभावी कार्य अतिशय पवित्र मानल्या जात असून हे कार्य करणाऱ्या गुरुजींचे समाजात वेगळेच स्थान आहे. मात्र गुरुवर्यांवर पाळत ठेवण्यासाठी अस्तित्वात आलेल्या शिक्षण विभागातील
चंद्रपूर : ज्ञान दानाचे सेवाभावी कार्य अतिशय पवित्र मानल्या जात असून हे कार्य करणाऱ्या गुरुजींचे समाजात वेगळेच स्थान आहे. मात्र गुरुवर्यांवर पाळत ठेवण्यासाठी अस्तित्वात आलेल्या शिक्षण विभागातील गलथान प्रणाली व अधिकाऱ्यांचे लाचखोरी धोरण यामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रालाही गालबोट लागले आहे.
गोंडपिपरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत तत्कालीन दोन गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रतापामुळे येथील प्रतिमा अगोदरच गेली असताना नुकताच उघडकीस आलेल्या बदली घोळामुळे शिक्षण विभाग पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. मागील सत्रात तालुक्यामध्ये पट संख्येवारीनुसार काही शिक्षक अतिरिक्त ठरले. अशा अतिरिक्त ठरणाऱ्यांना शिक्षकांना इतर शाळांमध्ये समायोजन करण्याचा वरिष्ठस्तरावरुन आदेश निघाल्याने येथील पं.स. गटशिक्षणाधिकारी सावरकर यांनी रिक्त पदे असलेल्या शाळांवर अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती केली.
मात्र, गोंडपिपरी जि.प. कन्या शाळा येथून अतिरिक्त ठरलेले अनिल पेंढारकर नामक शिक्षकाने गोंडपिपरी न सोडण्याचा चंग बांधून गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या आदेशानुसार चेकपिपरी शाळेवर रुजू न होता गोंडपिपरी कन्या शाळेवरच अध्यापन कार्य सुरू ठेवले. यामुळे चेकपिपरी येथे रिक्त असलेल्या जागेवर पानोरा येथील तक्रार बदली नुसार कुणाल दुधे नामक शिक्षकाचा आदेश काढण्यात आला. तर पानोऱ्याची रिक्त जागा भरण्याकरिता अडेगाव येथील जि.प. शिक्षक टिकले यांना पाठविण्याचे ठरले.
हा सर्व प्रकार लक्षात घेतला तर केवळ गोंडपिपरी येथील अनिल पेंढारकर नामक शिक्षकाला गोंडपिपरीच्याच शाळेवर ठेवण्याकरिता इतरत्र कुठल्याही शाळेवरील शिक्षकांची उचलबांगडी होत नाही आहे. या प्रकाराची जि.प. सदस्य अमर बोडलावार यांनी दखल घेवून जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी आशितोष सलील यांची भेट घेवून गोंडपिपरी पं.स. शिक्षण विभागातील सावळा गोंधळ उघडकीस आणून दिला.
हा सर्व प्रकार घडत असताना काही शिक्षकांचे मत जाणून घेतले असता, वादग्रस्त बदली प्रकरणातील तिनही शिक्षक कुठल्या ना कुठल्या शिक्षक संघटनांशी जुडले आहेत. या संघटनांच्या दबावतंत्रामुळे शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग हतबल ठरत असल्याची चांगलीच चर्चा सुरु आहे.
तर काहींच्या मते गटशिक्षणाधिकारी सावरकर यांनी पेंढारकर यांना भारमुक्तीचे आदेश् दिल्यानंतरही पेंढारकर हे बदली ठिकाणी का गेले नाही? तसेच गोंडपिपरी जि.प. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका निरांजने यांनी पेंढारकर यांना भारमुक्त का केले नाही? असे विविध प्रश्न करुन मोठे अर्थकारण होत असल्याचे बोलले जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)