शाळांत विलगीकरण केंद्र तयार करून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:23+5:302021-05-03T04:22:23+5:30
चंद्रपूर : ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांचे विलगीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, त्याचप्रमाणे घरांमधील अपुऱ्या ...
चंद्रपूर : ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांचे विलगीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, त्याचप्रमाणे घरांमधील अपुऱ्या खोल्या व अव्यवस्था यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक पंचायत समिती स्तरावर उत्तम स्थितीतील जिल्हा परिषद शाळेतील सर्व सोयींयुक्त विलगीकरण केंद्र तयार करण्याची मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांना पत्रे पाठवित त्यांच्याशी चर्चा केली आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने कळस गाठला आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूदर वेगाने वाढत आहे. आधी नागरी भागात प्रादुर्भाव होता. आता तो तालुका स्तरावरून ग्रामीण भागात पोहचला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग होत आहे. ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित झाली तर आर्थिक अडचणींमुळे त्या व्यक्तीला घरातच क्वारंटाईन केले जाते. त्या घरात एकच शौचालय, अपुऱ्या खोल्या यामुळे घरातील अन्य सदस्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळांमध्ये विलगीकरण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गावातील उत्तम काम करणाऱ्या बचत गटांना भोजन व नाश्त्याचे काम देऊन त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. या विलगीकरण केंद्रासाठी कंत्राटी पद्धतीने दोन कर्मचारी नेमून त्यांच्या माध्यमातून हे केंद्र संचालित करता येऊ शकते. यासंदर्भात आताच अनुमती दिल्यास किमान एक महिन्याच्या कालावधीत हे विलगीकरण केंद्र तयार होईल, यादृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली आहे.