कोरोना रुग्णांना थेट भरती करून घेण्यास प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 05:00 AM2021-05-03T05:00:00+5:302021-05-03T05:00:37+5:30

रुग्ण जवळच्या कोरोना केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात गेल्यावर तिथे रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल व इतर बाबींची तपासणी केली जाणार आहे. रुग्णांची नोंदणी पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. रुग्णांची गंभीर स्थिती पाहून केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार रुग्णाला आवश्यक सुविधायुक्त हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धतेनुसार वेळीच उपचार केले जाणार आहे. गरज नसलेल्या रुग्णांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरीच औषधोपचार केले जाणार आहे.

Prevention of direct recruitment of corona patients | कोरोना रुग्णांना थेट भरती करून घेण्यास प्रतिबंध

कोरोना रुग्णांना थेट भरती करून घेण्यास प्रतिबंध

Next
ठळक मुद्देरुग्णांची तयार होणार प्रतीक्षा यादी : केंद्रीय पद्धत अवलंबणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जो तो रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र प्रत्येकाला बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यातच वशिलेबाजी करून काहीजण बेड मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत; त्यामुळे गरीब तसेच गरजू रुग्णांची हेळसांड होत आहे. यावर तोडगा म्हणून जिल्हा प्रशासनाने कोविड-१९ पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित केले आहे. या माध्यमातून रुग्णांची नोंदणी तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार शासकीय तसेच खासगी रुग्णालयात बेड मिळवून देत उपचार केले जाणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी फरफट थांबणार असून रुग्णांनाही आवश्यकता आणि गरजेनुसार उपचार केले जाणार आहे.
रुग्ण जवळच्या कोरोना केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात गेल्यावर तिथे रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल व इतर बाबींची तपासणी केली जाणार आहे. रुग्णांची नोंदणी पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. रुग्णांची गंभीर स्थिती पाहून केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार रुग्णाला आवश्यक सुविधायुक्त हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्धतेनुसार वेळीच उपचार केले जाणार आहे. गरज नसलेल्या रुग्णांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरीच औषधोपचार केले जाणार आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून रुग्णांना चंद्रपूर शहरातील सर्व कोविड रुग्णालयात आय. सी. यू., व्हेंटिलेशन व ऑक्सिजन बेडच्या तीन स्वतंत्र प्रतीक्षा यादीनुसार बेड उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

कोविड केअर सेंटर ठेवणार माहिती
शहरातील कोविड रुग्णालयांना रुग्णांना परस्पर दाखल करता येणार नसून प्रथम रुग्णालयातील उपलब्ध रिक्त बेडची माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष व कोविड केअर सेंटरला द्यावी लागणार आहे. बेड रिक्त झाल्यावर संबंधित रुग्णालय तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष रुग्णाला माहिती देणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण थेट जाऊन उपचार घेऊ शकणार आहे. यामुळे प्रतीक्षा यादीतील गरजू रुग्णांना तत्काळ बेड उपलब्ध होणार आहे. बेड उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांची हेळसांड काही प्रमाणात का होईना, थांबणार आहे. 

रेमडेसिविर इंजेक्शनचीही द्यावी    लागणार माहिती
या पोर्टलमध्ये रुग्णालयाला दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची माहितीसुद्धा उपलब्ध राहणार आहे.  पोर्टलच्या पहिल्या पानावर कोविड हॉस्पिटल, डॉक्टर व त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांची माहिती व मोबाईल क्रमांक  देण्यात येणार आहे. 

खोटे बोलणे रुग्णालय प्रशासनाच्या येणार अंगलट
शहरातील काही कोविड रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असतानाही रुग्णांना उपलब्ध करून दिले जात नाहीत. अनेक वेळा फी भरल्याशिवाय बेड दिलेच जात नाहीत. त्यामुळे आता अशा रुग्णालयांवरही निर्बंध आले आहेत. रुग्णालयातील रिक्त जागेबाबत त्यांना प्रथम जिल्हा नियंत्रण कक्ष व कोविड केअर सेंटरला माहिती द्यावी लागणार आहे. या केंद्रातून येणाऱ्याच रुग्णाला दाखल करून घ्यावे लागणार आहे.
 

पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
रुग्णांना सुविधा होणाऱ्या या पोर्टलचे उद्घाटन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, महापालिका आयुक्त राजेश मोहिते, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर आदी उपस्थित होते.

प्रथमच बेड अलाॅयमेट प्रणाली

रुग्णांना प्रतिक्षा यादीतील आपले स्थान कंट्रोल रूमच्या ०७१७२-२७४१६१ व ०७१७२-२७४१२ या क्रमांकावरून देखील माहिती करून घेता येणार आहे.  रूग्णांना वैयक्तिक नोंदणी करता येणार नाही. कोविड रूग्णांसाठी ऑनलाईन बेड अलॉटमेंट प्रणाली चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम कार्यान्वित करण्यात आले आहे. रूग्णांना शासकीय व खाजगी कोविड रूग्णालयात अतिदक्षता, व्हेंटीलेटर व ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी याचा थेट लाभ होणार असून रूग्णांनी कोविड केअर सेंटरमध्ये नोंदणी करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

अशी होणार नोंदणी
प्रत्येक रुग्णाला त्याच्या आवश्यकतेप्रमाणे रुग्णालय व बेड उपलब्ध  होणार आहे. नोंदणी करताना रुग्णाचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी, आरटीपीसीआर तपासणी अहवाल आवश्यक आहे. तसेच नोंदणी करताना एका मोबाईल क्रमांकावरून  चार रुग्णांची नोंदणी करता येऊ शकणार आहे. मोबाईल नसल्यास त्यांना इतरांच्या मोबाईलवरूनदेखील नोंदणी करता येणे शक्य होणार असल्याची माहिती  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. सदर पोर्टल कार्यान्वित करण्यासाठी नागपूर येथील लॉज त्रिमूर्ती  या संस्थेचे सहकार्य लाभले आहे

 

Web Title: Prevention of direct recruitment of corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.