धानाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव द्यावा
By Admin | Published: March 27, 2017 12:42 AM2017-03-27T00:42:54+5:302017-03-27T00:42:54+5:30
धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर, धानाला किमान तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
धान उत्पादकांची मागणी : राबराब राबूनही आर्थिक संकट
नागभीड : धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर, धानाला किमान तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
नागभीड तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. धानपिकावर या तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. असे असले तरी या पिकाच्या संवर्धनासाठी सिंचनाच्या कोणत्याही सोयी या तालुक्यात नाहीत. जवळपास ९० टक्के शेती ही नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. नागभीड तालुक्यात घोडाझरी तलाव केवळ नावाला आहे. या तलावाचा बहुतांश फायदा सिंदेवाही तालुक्याला होत आहे. कसर्ला तलाव नागभीड तालुक्यात आहे. पण त्याची सिंचन मर्यादा मर्यादित आहे. नागभीड तालुक्यातील भातशेती सर्वार्थाने नैसर्गिक पावसावरच अवलंबून आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
या सर्व परिस्थितीवर मात करून नागभीड तालुक्यातील शेतकरी धानाचे पीक घेत आहे. परवडत नसले तरी कर्ज काढून या तालुक्यातील शेतकरी आपले परंपरागत कर्तव्य निभावत आहे. मात्र शेतकऱ्याच्या परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी शेतकऱ्यांच्या शिरावर कर्जाचे डोंगर चढत आहेत.
नागभीड तालुक्यात जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे.
सर्व संकटावर मात करून शेतकरी जे काही उत्पन्न घेतो आणि नंतर बाजारात त्याची विक्री करतो. तेव्हा त्याला जे भाव मिळते ते अतिशय कवडीमोल असते. गेल्या १० वर्षात मजुरीत, खताच्या किंमतीने दशपटीने वाढ झाली असली तरी धानाच्या किंमतीत झालेली वाढ अतिशय नगण्य आहे. आलेल्या उत्पन्नातून झालेला खर्च वजा केला तर शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. ही खरोखरच शेतकऱ्यांसाठी शोकांतिका आहे. त्यामुळे धानाला भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)