इको-प्रोच्या स्वच्छतेचा ‘मन की बात’ मध्ये गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:31 PM2017-10-29T23:31:12+5:302017-10-29T23:31:28+5:30
शहरात पर्यावरण व वन्यजीव तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया इकॉलाजीकल प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन (इको-प्रो) संस्थेतर्फे सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानास आज २२९ दिवस पूर्ण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात पर्यावरण व वन्यजीव तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया इकॉलाजीकल प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन (इको-प्रो) संस्थेतर्फे सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानास आज २२९ दिवस पूर्ण झाले. या स्वच्छता अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख करीत कामाचा गौरव केला. ही बाब चंद्रपूर शहरासाठी तसेच इको-प्रो संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.
किल्ला स्वच्छता अभियान ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत जिल्हातील ऐतीहासीक वारसा संवर्धनाचा उद्देश समोर ठेवून सुरू करण्यात आलेला आहे. जे आजही नियमीतपणे अविरत सुरू आहे. स्वच्छताच नाही तर आपला ऐतिहासिक वारसा जतन केला जावा याकरिता सुध्दा या अभियानाचे महत्व असून अशाप्रकारे सर्व ठिकाणी स्वच्छतेसंदर्भात कार्य केले गेले पाहीजे, असा उल्लेख सुध्दा केला. इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या या अभियानाचे सामूहिकता आणि सातत्यता याचाही उल्लेख केला आहे.
सदर किल्ला स्वच्छता अभियान १ मार्च २०१७ पासून नियमीतपणे रोज सकाळी ६ ते १० या वेळेत इको-प्रो संस्थेचे कार्यकर्ते श्रमदान करीत आहे. आज या अभियानाचा २२९ वा दिवस असून आजही सदर अभियान सुरू आहे. या अभीयानात चंद्रपूर शहरात गोलाकार बांधण्यात आलेल्या गोंडकालीन ५५० वर्ष जुना किल्ला परकोट ११ किमीचा परिसर स्वच्छ केला जात आहे. ११ किमी किल्लाच्या भितींपैकी जवळपास ७ किमी लांबीची भिंत स्वच्छ करण्यात आलेली आहे. एकुण ३९ कुण बुरूज पैकी २५ बुरूज स्वच्छ करण्यात आलेले असून ४ मुख्य दरवाजे, ५ खिडक्या पैकी ४ खिडक्या स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी २९ सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर किल्लावर स्वच्छता अभियानात स्व:ता श्रमदान करीत सहभागी झाले होते. त्यांनी या अभियानाची माहिती पंतप्रधान कार्यालयास एका पत्राव्दारे कळविली होती. तसेच पुरातत्व खात्याचे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची इको-प्रो च्या शिष्टमंडळानी भेट घेऊन माहिती दिली होती.
खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतल्यामुळे अभियानातील सहभागी सर्व सदस्याचे मनोबल उंचवले आहेत. ‘मन की बात’ मध्ये इको-प्रोच्या कार्याची दखल म्हणजे संस्थेस मिळालेला पुरस्कार आणि सन्मान आहे. यामुळे संस्थेचे काम अधिक जोमाने पुढे नेण्यास आणखी बळ मिळाले आहे.
- बंडू धोतरे
इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष