प्राथमिक शिक्षण यशस्वी जीवनाचा पाया
By admin | Published: June 30, 2016 01:16 AM2016-06-30T01:16:17+5:302016-06-30T01:16:17+5:30
प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या बालमनावर योग्य संस्कार शिक्षकांच्या माध्यमातून केले जातात.
रिता जिलटे : विसापुरात पाठ्यपुस्तक व गणवेश वितरण
बल्लारपूर : प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या बालमनावर योग्य संस्कार शिक्षकांच्या माध्यमातून केले जातात. आज घडीला इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल वळत असला तरी, मराठी माध्यमाच्या शाळेतून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज असून प्राथमिक शाळा शिक्षणात यशस्वी जीवनाचा पाया म्हणून पालकांनी विचारा करावा, असे मत विसापूरच्या सरपंच रिता जिलटे यांनी केले.
बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत विसापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वस्ती विभागात मंगळवारी शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश वितरण व पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रिता जिलटे, ग्रामपंचायत सदस्य सचिन टोंगे, मुख्याध्यापक रेखा कुलटे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अरुण जीवने, प्रतिभा टेकाम, अर्चना धोटे, नंदा वडस्कर, बेबी राऊत, रोहिणी धोटे, सविता वडस्कर, सुरेखा धोट, सोनाली पिंपळकर, पंचशिला पाटील यांच्यासह पालकांची उपस्थिती होती.
दरम्यान ‘मुलगा-मुलगी एक समान, दोघांनाही शिकवा छान’ संदेश देणारी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर शाळेत आयोजित कार्यक्रमात वर्ग एक ते चवथीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणवेश वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सोनाली पिंपळकर यांनी तर आभार पंचशिला पाटील यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)