प्राथमिक आरोग्य केंद्रांत ७५ डॉक्टर रूजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:53 AM2019-08-28T00:53:57+5:302019-08-28T00:54:20+5:30
ग्रामीण भागातील साथरोग, किटकजन्य आजार, लसिकरण, कुटंब कल्याण, अशा विविध आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार केल्या जाते. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस पदवी प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११६ मंजूर पदे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पावसाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर उपचार करता यावे, याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ७५ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. आरोग्य केंद्रातील रिक्तपदी बीएएमएस पदवी प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची (गट अ) नुकतीच समुपदेशनाने नियुक्ती झाल्याने जनतेच्या आरोग्य समस्या दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील साथरोग, किटकजन्य आजार, लसिकरण, कुटंब कल्याण, अशा विविध आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार केल्या जाते. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस पदवी प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११६ मंजूर पदे आहेत. केवळ ४१ वैद्यकीय अधिकारी आहेत. उर्वरीत रिक्त पदांमुळे दर्जेदार आरोग्य सेवा देण्याकरिता अडचणी निर्माण झाल्या. नागरिक व लोकप्रतिनिधींच्या तक्रारी वाढल्या. परिणामी, राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठित करण्यात आली. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड आदींनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७५ वैद्यकीय अधिकाºयांची कंत्राटी स्वरूपातनियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावा, याकरिता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यावश्यक सुविधा व औषधीसाठा उपलब्ध करून देण्यात आला.
-डॉ. राजकुमार गहलोत,
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्ह्यात बीएएमएस पदवीप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३५ पदे मंजूर आहेत. यापैकी ३३ पदे कार्यरत असुन २ पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदे लवकरच भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना उपचारासाठी संकटांचा सामना करावा लागणार नाही, यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
-डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी