ताडोबातील अतिसंवेदनशील ९२ गावांमध्ये प्रायमरी रिस्पॉन्स टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:49 AM2020-02-17T11:49:33+5:302020-02-17T11:50:06+5:30
मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा परिसरातील ९२ गावांतील १ हजार नागरिकांची प्रायमरी रिस्पॉन्स टीम (पीआरटी) सज्ज करण्यात आली आहे.
राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा परिसरातील ९२ गावांतील १६० नागरिकांची प्रायमरी रिस्पॉन्स टीम (पीआरटी) सज्ज करण्यात आली आहे. यात स्थानिक नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. ताडोबा वन क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांची ही संकल्पना असून यात वनविभाग व ग्रामस्थ यांच्या दरम्यानचे मध्यस्थ म्हणून ही चमू काम करणार आहे. जंगलात लागणारा वणवा, होणाऱ्या चोऱ्या, वन्य-मानवातील संघर्ष अशा अनेक बाबींवरचा हा तोडगा काढण्यात आला आहे.
या नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्यांना दरमहा एक हजार रुपयांचे मानधनही दिले जाणार असल्याची माहिती आहे. बफर झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. तसेच या नागरिकांना जंगलाची अधिकाधिक माहितीही असते. या गोष्टीचा लाभ घेत त्यांच्यासाठीच हा उपक्रम राबवण्यात येतो आहे.