पंतप्रधानांनी गौरवोल्लेख करण्यासारखी कामे करा
By admin | Published: February 25, 2017 12:34 AM2017-02-25T00:34:55+5:302017-02-25T00:34:55+5:30
विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही, ..
सुधीर मुनगंटीवार : विजयी भाजपा उमेदवारांचा अभिनंदन सोहळा
चंद्रपूर : विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही, या सूत्रानुसार भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या क्षेत्रात कार्यरत आहे. सत्तेला आम्ही नेहमीच जनतेच्या सेवेचे साधन मानले आहे. या जिल्ह्यातील जनतेने विकासाच्या गाडीची गती वाढविण्यासाठी मतरूपी
आशीर्वादाच्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखविली आहे. या विजयाच्या मुळाशी कार्यकर्त्यांची शक्ती आहे. आम्हाला या जिल्ह्यास प्रगतीच्या शिखरावर न्यायचे आहे. त्यातून एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमात जिल्हा असावा, तर चंद्रपूर जिल्ह्यासारखा असा गौरवोल्लेख करतील, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 24 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपा उमेदवारांच्या अभिनंदन सोहळ्यात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, आ. नाना शामकुळे, आ. संजय धोटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी मंत्री संजय देवतळे, जैनुद्दीन जव्हेरी, विजय राऊत, देवराव भोंगळे, संध्या गुरनुले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, जो निवडून येतो त्याच्यासमोर जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आव्हान असते. आपण हे आव्हान हे निश्चितपणे पूर्ण कराल, असा मला विश्वास आहे. जिल्हा परिषदेचा संबंध ग्रामीण भागाच्या विकासाशी प्रामुख्याने निवारा, शिक्षण, रस्ते, पाणी, कृषी क्षेत्र आदींशी येते. जि.प. च्या कायद्यांचा अभ्यास करत प्रत्येक विजयी उमेदवाराने आपले जनसंपर्क कार्यालय उघडून त्या माध्यमातून जनतेची सेवा करावी, आपल्या मतदार संघाच्या विकासाचा पाच वर्षांचा आराखडा तयार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हा विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून, जनतेच्या आशिवार्दातून साकारला असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. जनतेच्या विकासासंबंधी आशा-आकांक्षांची पूर्तता करीत त्या माध्यमातून भाजपाचे संघटनकार्य अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आ. नाना शामकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आदींची समयोचित भाषणे झालीत. सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भाजपा नेते प्रमोद कडू यांनी केले. कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)