मनपातर्फे पंतप्रधान स्वनिधी सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:38 AM2020-12-30T04:38:06+5:302020-12-30T04:38:06+5:30
चंद्रपूर : केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पंतप्रधान स्वनिधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ...
चंद्रपूर : केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पंतप्रधान स्वनिधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अतंर्गत क्षेत्रीय स्तर समितीची बैठक आयुक्त राजेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली मनपा स्थायी समिती सभागृहात पार पडली.
याप्रसंगी बँकेकडे थकीत असलेले पथविक्रेत्यांचे अर्ज निकाली काढण्यासंबंधी सूचना बँक प्रतिनिधींना देण्यात आल्या. काही पथविक्रेते लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप याप्रसंगी करण्यात आले.
या योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना १० हजार रुपयांपर्यंतचे फिरते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त राजेश मोहिते यांनी याप्रसंगी दिली.
अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक असलेले पथविक्रेते शहरवासीयांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. नियमित परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे. या उद्दिष्टांच्या आधारे पथविक्रेत्यांना औपचारिकरित्या अर्थसहाय्य करण्यास सदर योजना मदत करेल आणि या घटकाला त्यांची आर्थिक घडी बसविण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करेल, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त संतोष कंधेवार, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक शंभुनाथ झा, समाजकल्याण अधिकारी सचिन माकोडे व शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे प्रबंधक उपस्थित होते.