खासगी बाजारपेठेत दर घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:25 AM2018-11-30T00:25:56+5:302018-11-30T00:26:53+5:30
कापसाचे खासगी बाजारपेठेत वाढलेले भाव अचानक घसरल्याने त्याचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कापसावर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने कापसाचे दर कमी झाल्याने उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणार की नाही, याची चिंता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगलीच सताऊ लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कापसाचे खासगी बाजारपेठेत वाढलेले भाव अचानक घसरल्याने त्याचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कापसावर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने कापसाचे दर कमी झाल्याने उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणार की नाही, याची चिंता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगलीच सताऊ लागली आहे.
विदर्भ प्रांत कापूस उत्पादनात पूर्वीपासूनच अग्रेसर आहे. येथील काळ्या कसदार मातीत बळीराजा पांढरे सोने पिकवितो. खरे तर चंद्रपूर जिल्हा कापूस पिकविण्यात आजपर्यंत पुढे राहिला आहे. यंदा सुरूवातीपासूनच कापसाला बऱ्यापैकी भाव होता. जवळपास सहा हजारांपर्यंत कापसाचे दर गेल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या घरी सुबत्ता येईल, असे वाटत होते. मात्र खासगी बाजारपेठेत कापसाचे दर ४०० ते ५०० रूपयांनी कमी झाले. सध्या पाच हजार ५०० रूपयांनी खासगी बाजारपेठेत कापूस विकला जात आहे. कापसाची आवक वाढल्याने खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडल्याचे बोलले जात आहे. यावर्षी निसर्गानेही शेतकऱ्यांना साथ दिली नाही. त्यामुळे कापसासह अन्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केला. परंतु यावर्षी कापसाने शेतकºयांचे घर अजूनही भरले नाही.
जिथे २० क्विंटल कापूस व्हायला पाहिजे, त्या शेतात उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघणे कठीण आहे. कापूस चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांचे नगदी पीक आहे. गोवरी, पोवनी, वरोडा, साखरी, चार्ली, निर्ली, धिडशी, पेल्लोरा, चिंचोली, निंबाळा परिसरातील कपाशीची शेती वाळायला लागली आहे. खासगी बाजारपेठेत कापसाचे दर ५०० रूपयांनी खाली आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.
कापूस उत्पादकांच्या पदरी निराशाच
कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक असल्याने शेतकरी दिवस रात्र शेतात काबाडकष्ट करतो. परंतु यावर्षी अपुऱ्या पावसामुळे निसर्गानेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे. नापिकीने शेतकऱ्यांना घेतलेले कर्जही फेडणे मुश्किल झाले आहे. शेतकºयांना घामाचे दाम मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे.
यंदा कापूस पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी अतोनात खर्च केला. परंतु त्यानंतरही उत्पादनात घट झाल्याने यावर्षी कापसाची शेती शेतकऱ्यांना परवडण्यासारखी राहिली नाही. त्यात खासगी बाजारपेठेत कापसाचे दर घसरल्याने आम्ही चिंतातूर झाला आहे.
- गणपत लांडे, शेतकरी.