कापूस दरवाढीने खासगी व्यापारी मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:25 PM2019-03-18T23:25:37+5:302019-03-18T23:25:50+5:30
कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. मध्यंतरी कापसाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल दरात कापसाची विक्री केली. मात्र आता कापसाचे दर पाच हजार आठशे रूपयांवर पोहचल्याने या कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे. शेतकºयांच्या घरी आता कापूस शिल्लक नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. मध्यंतरी कापसाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल दरात कापसाची विक्री केली. मात्र आता कापसाचे दर पाच हजार आठशे रूपयांवर पोहचल्याने या कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे. शेतकºयांच्या घरी आता कापूस शिल्लक नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा, भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकवला जातो. कापूस पिकासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने कवडीमोल भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही. शासनाने कापूस पिकांसाठी पाच हजार चारशे पन्नास रूपये हमीभाव जाहीर केला. परंतु सरकारी केंद्रावरील जाचक अटीने शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडे कापूस विक्रीसाठी नेला नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी मिळेल त्या कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला.
दरवर्षीपेक्षा यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असतानाच खुल्या बाजारपेठेत कापसाचे भाव गडगडले. काही शेतकऱ्यांनी नाईलाजाने कवडीमोल दरात कापूस विकून आपली आर्थिक गरज भागविली. कापसाचे दर वाढण्याचे कोणतेच संकेत नसल्याने शेतकºयांनी बँकाचे कर्ज भरण्यासाठी कापूस विकून टाकला. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी कापूस पिकावर केलेला खर्चही भरून निघाला नसल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला आहे.
कापसाचे दर आता ४०० ते ५०० रूपयांनी वाढल्याने त्याचा सर्वाधिक फायदा खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या घरी कापूस होता, त्यावेळेस भाव वाढले नाही. आता कापूस संपल्यावर कापसाचे दर वाढले आहे. त्यामुळे कापूस दरवाढीचा सर्वाधिक फायदा खासगी व्यापाºयांना झाला आहे. यात मात्र नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.
कापूस दरवाढ कुणासाठी?
शेतकरी आपल्या गरजेपोटी कवडीमोल दरात कापूस विकत असतो. यावर्षी कापसाची दरवाढ होईल, या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला होता. परंतु मार्च एन्डींगमध्ये कर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला. आता कापसाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे.