खासगी ट्रॅव्हल्स अडविल्या

By admin | Published: November 30, 2015 12:56 AM2015-11-30T00:56:18+5:302015-11-30T00:56:18+5:30

चिमूर ते चंद्रपूर मार्गावर प्रवासी वाहतुकीच्या विना परवान्याने मागील काही वर्षापासून खासगी ट्रॅव्हल्स धावत आहे.

Private Travels blocked | खासगी ट्रॅव्हल्स अडविल्या

खासगी ट्रॅव्हल्स अडविल्या

Next

काळी-पिवळी चालकांचा आरोप : विना परवाना धावत आहेत ट्रॅव्हल्स
वरोरा : चिमूर ते चंद्रपूर मार्गावर प्रवासी वाहतुकीच्या विना परवान्याने मागील काही वर्षापासून खासगी ट्रॅव्हल्स धावत आहे. त्यामुळे काळीपिवळी चालविणाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली. त्या निषेधार्थ मागील पाच दिवसांपासून काळीपिवळी चालकांनी आपली वाहने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बंद ठेवली. परंतु त्यावर काहीही तोडगा निघाला नसल्याने आज रविवारी चिमूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स वरोरा येथील रत्नमाला चौकात काळीपिवळी वाहन चालकांनी रोखून धरल्या होत्या. काही वेळानंतर वरोरा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून ट्रॅव्हल्स रवाना केल्या.
चंद्रपूर-चिमूर मार्गावरील मागील काही वर्षापासून १२ ट्रॅव्हल्स धावत आहे तर वरोरा-चिमूर मार्गावर २० काळपिवळी वाहने धावत आहे. काळीपिवळी वाहने शासनाने बेरोजगारी कमी करण्याकरिता सुशिक्षित युवकांना सबसिडीवर देऊन त्याकरिता कर्जही दिले आहे. प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना काळीपिवळी वाहनास शासनाने दिला असल्याने काळीपिवळी वाहनात प्रवासी बसवून मागील काही वर्षापासून सुशिक्षित बेरोजगार आपली उपजीविका करीत आहे. असे असताना चंद्रपूर-चिमूर मार्गावर मागील काही वर्षापासून खासगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात धावत आहे. खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना कमी पैशाचे प्रलोभन दाखवून आपल्या वाहनात बसवून नेत आहे. चंद्रपूर-चिमूर मार्गावर चालणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना नाही. टप्पा प्रवासी घेता येत नाही. असे असताना प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून मागील काही वर्षापासून चिमूर-चंद्रपूर मार्गावर १२ खाजगी ट्रॅव्हल्स राजरोसपणे चालू आहे. विना परवान्याने धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बंद कराव्यात, या मागणीकरिता वरोरा चिमूर मार्गावर चालणाऱ्या २० काळीपिवळी वाहने मागील पाच दिवसांपासून बंद ठेवीत आज ट्रॅव्हल्स रोखून धरल्या. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)

परवाना नसल्याचे माहिती अधिकारात उघड
चंद्रपूर-चिमूर मार्गावर चालणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे क्रमांक देऊन प्रवासी वाहतूकीचा परवाना आहे किंवा नाही याची माहिती माहितीच्या अधिकारात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे मागण्यात आली. त्यात एकाही खाजगी ट्रॅव्हल्सला चंद्रपूर-चिमूर मार्गावर प्रवासी वाहतुकीचा परवाना नसल्याची माहिती देण्यात आली. परंतु उपप्रादेशिक विभागाचे आजपावेतो कार्यवाही केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काळीपिवळी चालकांचे शासनाकडे हमीपत्र
काळीपिवळी वाहन सुशिक्षीत बेरोजगारांना शासनाने अर्थसहाय घेवून दिल्या. त्यासोबतच १०० रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर मी नोकरी करणार नाही, असे हमीपत्रही शासनाने घेतले. त्यामुळे काळीपिवळी वाहने घेणाऱ्यांना इतर व्यवसायाकरिता कर्ज व नौकरी मिळणार नाही. त्यामुळे याच व्यवसायावर आत्मनिर्भर राहताना खासगी ट्रॅव्हल्समुळे प्रवासी मिळत नाही. त्यामुळे काळीपिवळी वाहन चालक मालकासमोर आव्हान उभे ठाकले आहे.

एसटीलाही फटका
वरोरा-चिमूर मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स धावत असताना ते कमी दरात प्रवाश्यांना घेऊन जात असल्याने प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सची वाट बघतात. याचा फटका एसटी बसलाही बसत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Private Travels blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.