भाजपात पक्षविरोधी कारवाया करणाऱ्याला बक्षिसी
By admin | Published: July 25, 2016 01:19 AM2016-07-25T01:19:50+5:302016-07-25T01:19:50+5:30
भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेल्या मूल नगर परिषदेतील सत्ताधारी पक्षाचे गटनेता अनिल संतोषवार यांना संजय गांधी ...
असंतोष पसरला : संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्षपद
मूल : भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेल्या मूल नगर परिषदेतील सत्ताधारी पक्षाचे गटनेता अनिल संतोषवार यांना संजय गांधी अनुदान योजना समितीचे अध्यक्षपद बहाल करण्यावरून पक्षात स्थानिक पातळीवर मोठा असंतोष पसरला आहे. आपल्याच पक्षाच्या तत्कालीन नगराध्यक्षांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी विरोधी पक्षाला सहकार्य करण्याच्या प्रकार करणाऱ्याला जर महत्त्वाच्या पदावर बसविले जात असेल तर प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणाऱ्यांनी आयुष्यभर धुनी-भांडी आणि सतरंजी उचलण्याचेच काम करावे काय, असा संतप्त सवाल पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे.
या मूल नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष उषा शेंडे यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी पालिकेतील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मोट बांधण्यास सुरूवात केली असताना गटनेता असलेले अनिल संतोषवार हे त्यावेळी पालिकेत उपाध्यक्षपदावर होते. त्यांनीच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना भरीव मदत करून शेंडे यांच्याविरूद्ध अविश्वास आणण्याची तयारी चालविली होती. पालिकेत सत्तेत असलेल्या आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांना उषा शेंडे यांच्याविरूद्ध भडकाविण्याचे आणि अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करण्यास संतोषवार यांनी विरोधकांना महत्त्वपूर्ण सहकार्य केले. परंतु आरोग्य सभापती मिलिंद खोब्रागडे यांची सद्सद्विवेक बुध्दी जागृत झाल्याने त्यांनी अविश्वास प्रस्तावाचे संपूर्ण कारस्थान जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे उघड केले. त्यावर वेळीच सतर्क होऊन ना. मुनगंटीवार यांनी अविश्वास प्रस्तावाचे संपूर्ण नाटक उधळवून लावले. त्यावेळी या कटकारस्थानाचे मुख्य सूत्रधार म्हणून अनिल संतोषवार यांचे नांव पुढे आले होते.
संतोषवार यांना संजय गांधी अनुदान योजना समिती अध्यक्षपदासह तालुका स्तरीय दक्षता समिती आणि शांतता समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. पक्षाशी बेइमानी करून आपल्याच पक्षाच्या नगराध्यक्षाविरूद्द अविश्वास आणू पाहणाऱ्या कारस्थानात सिंहाचा वाटा उचलणाऱ्याला संजय गांधी अनुदान योजना समितीचे अध्यक्ष पदासोबतच इतरही पदे बहाल केले जात असेल तर शिस्तप्रिय म्हणून या पक्षाने का मिरवावे, अशी घणाघाती टिका संतोषवार यांच्या विरोधकांकडून केली जात आहे.
संतोषवार यांनी पक्षाचे माध्यमातून यापूर्वी अनेक महत्त्वाची पदे उपभोगली आहेत. या काळातही ते अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत. अशा वादग्रस्त व्यक्तिमत्वाला जबाबदारीच्या पदावर बसविताना त्यांचा पूर्वीच्या इतिहास पहायला नको काय, असा प्रश्न या निमित्ताने विचारल्या जात आहे. पक्षाच्या प्रामाणिक, जेष्ठ कार्यकर्त्यांना डावलून किंवा त्यांना कमी महत्त्वाचे पद देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याच्या आरोप केला जात आहे.
पक्षात आपले आयुष्य घालविणारे अनेक जेष्ठ कार्यकर्ते मूल शहरात आणि तालुक्यात आहेत. त्यांनी पदाची लालसा किंवा अपेक्षाही केलेली नाही. मात्र काही महत्त्वाच्या पदांवर पक्षाशी प्रामाणिक राहिलेले आणि जबाबदारी पूर्ण काम करू शकेल, अशा व्यक्तीची नेमणूक करावी, अशी त्यांची इच्छा आहे. अशी प्रामाणिक व्यक्तीच समाजाला आणि पक्षाला योग्य न्याय देऊ शकते. जबाबदार पदावर जबाबदार व्यक्तीची निवड झाली तर त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना पक्षासाठी काम करण्याची उर्जा मिळते, अशी प्रांजळ भावना भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
विस्मृतीचा संतोषवार यांना फायदा
अनिल संतोषवार यांच्या या उपद्रवामुळे व्यथित होऊन पालकमंत्र्यांनी त्यांना वाळीत टाकले होते. पक्षाच्या ज्या नगरसेवकांना विविध आमिष दाखवून उषा शेंडे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने आणले होते, त्यांनी भाजपच्या संतोषवार यांच्यापासून लांब राहणे पसंत केले. सदर घटनेला तीन वर्षांच्या काळ लोटला असून या काळात पुला खालून बरेच पाणी गेले. पक्षावर नामुष्की येणाऱ्या या घटनेच्या सर्वांना विसर पडला. त्याच्याच फायदा संतोषवार यांना झाला आहे.