शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी
By admin | Published: April 29, 2016 01:09 AM2016-04-29T01:09:36+5:302016-04-29T01:09:36+5:30
शेतकरी व शेतमजुरांना योग्य न्याय व त्यांचा हक्क मिळण्याचा दृष्टीने आम आदमी पार्टी ब्रम्हपुरीच्या वतीने ‘शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी’ हा उपक्रम सुरू केला आहे.
आपचा उपक्रम : मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मांडणार समस्या
चंद्रपूर : शेतकरी व शेतमजुरांना योग्य न्याय व त्यांचा हक्क मिळण्याचा दृष्टीने आम आदमी पार्टी ब्रम्हपुरीच्या वतीने ‘शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या समस्या जाणून घेवून त्यांच्याकडून निवेदन लिहून घेतले आहे. हे सर्व निवेदन घेऊन आपच्या वतीने मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात येत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची सिंचन व योग्य भावाअभावी दयनीय अवस्था झाली आहे. उचल केलेले कर्ज व झालेल्या खर्चापायी आत्महत्या करण्याची पाळी बहुसंख्य शेतकऱ्यांवर आली आहे. प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे अनुदान शासनाकडून देण्यात आले नसून ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांनासुद्धा झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात पिक विम्याची रक्कम मिळाली नाही. पिक विमा योजनेमध्येसुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. गोसीखुर्द प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे. मौजा एकारा येथे मुख्य गेटची दुरुस्ती व नवीन गेट बसविण्याचे काम तात्काळ करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या मजगीचे पुनर्जीवनाचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात यावे. शेतातील कामे मग्रारोहयोअंतर्गत सुरु करण्यात यावे, उत्पादन खर्चावर आधारित भाव, पुरेशी साठवण व्यवस्था, पूर्ण वेळ वीज पुरवठा, डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी, ३० वर्षापासून पट्याने मिळालेल्या जमिनी कसणाऱ्यांना भूमिस्वामीमध्ये रुपांतर करुन देण्यात यावे. वर्ग २ च्या जमीनीचे वर्ग १ मध्ये रुपांतर व्हावे, मजुरांना प्रति वर्षी प्रति मजूर १०० दिवस प्रमाणे रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा. मग्रारोहयोअंतर्गत प्रलंबित असलेल्या मजुरांची मजुरी तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात मोबदला देण्यात यावा. वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीस आळा बसावा, सन २०१६-१७ च्या खरीप हंगामाकरिता दर्जेदार बियाणे व पुरेशा खताची व्यवस्था करावी व प्रथम शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. शेती आणि शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी केवळ घोषणाऐवजी प्रत्यक्ष कृती व परिणाम दिसावा, अशा मागण्या लावून धरण्यात येणार आहे. शेतकरी समस्या जाणून घेण्याकरिता पुरुषोत्तम गेडाम, युवराज नाकतोडे, लिना मस्के, वंदना गजभिये, संदीप धोटे, हिरालाल इंदोरकर, मनोहर पवार, खटुजी गुरनुले, पुष्पा पवार, रामचंद्र सयाम, किशोर गेडाम, सुधीर बाळबुध्दे, क्रीष्णा मानकर, सुंदरशहा सिडाम यांनी परिश्रम घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)