वरोºयातील केशवनगरात माकडांचा उपद्रव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:33 AM2017-09-07T00:33:35+5:302017-09-07T00:33:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : शहरालगतच्या केशवनगर परिसरात मागील कित्येक दिवसांपासून माकडाने उपद्रव घालणे सुरू केले आहे. या माकडाने अनेकांना चावा घेवून जखमी केल्याच्या घटना दिवसागणिक वाढत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
वरोरा शहरानजीकच्या नागपूर - चंद्रपूर मार्गालगत आनंदवन चौकानजीक केशवनगर वसाहत आहे. या वसाहतीमध्ये मागील काही दिवसांपासून माकडांचा हैदोस सुरू आहे. घराच्या छतावर वाळवत घातलेले धान्य, अंगणात असलेल्या खाण्याच्या वस्तू पळविणे माकडाने सुरू केले आहे. यातच सध्या माकड एवढे निर्ढावले आहे की, एकट्या मनुष्याने त्यास पिटाळण्याच्या प्रयत्न केला असता, त्या व्यक्तीच्या अंगावर धावून जात त्याला जखमीही करीत असतात. माकडाने प्रौढ व्यक्ती सोबतच लहान बालकांनाही लक्ष केले असून उर्त्कष मनोज सातपुते या बालकास नुकतेच माकडाने गंभीर जखमी केले. जखमी बालकावर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
माकडाच्या उपद्रवामुळे नागरिकांचे परिसरात फिरणेही बंद झाले आहे. माकड परिसरातील झाडझुडपात दडून बसत एखादी व्यक्ती काही वस्तू घेवून जात असताना झडप घालत असते. त्यामुळे वस्तू पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने केशवनगरातील नागरिक त्रस्त झाले आहे. माकडांचा बंदोबस्त करण्याकरिता काही नागरिकांनी वनविभागास सुचना दिली. परंतु वनविभाग माकडांचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केशवनगरातील नागरिकांनी केला आहे.
दोन ते तीन वेळा जाळे टाकून माकडाला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु माकड सापडले नाही. आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- के.के. लोणकर,
वनाधिकारी, वरोरा.