आमदारांनी जाणून घेतल्या रेशन दुकानदारांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:26 AM2021-03-20T04:26:11+5:302021-03-20T04:26:11+5:30
कोरपना येथे दक्षता समितीची बैठक : प्रत्येक गावात समितीचे फलक लागणार कोरपना : येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी दक्षता ...
कोरपना येथे दक्षता समितीची बैठक
:
प्रत्येक गावात समितीचे फलक लागणार
कोरपना : येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी दक्षता समिती व तालुक्यातील रेशन दुकानदारांची बैठक पार पडली. या बैठकीत आ. सुभाष धोटे यांनी रेशन दुकानदारांच्या समस्या समजून घेतल्या व दुकानदारांना ग्राहकांशी सामंजस्याने वागण्याच्या सूचना केल्या.
समिती स्थापन झाल्यानंतर कोरपना तालुका दक्षता समितीची ही पहिलीच बैठक होती. कोरपना तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार महेंद्र वाकलेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, गडचांदूरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम, पुरवठा निरीक्षण अधिकारी मनिषा गंभीरे, प्रा. आशिष देरकर, प्रा. उमेश राजुरकर, अभय मुनोत, शैलेश लोखंडे यांच्यासह दक्षता समितीचे सदस्य सरिता पोडे, रुंद्रा सिडाम, गौतम निरंजने, अनिल मेश्राम, उषा चौधरी, देवराव सोनटक्के, वामन भिवापूरे, विलास मडावी, आशा मडावी, अर्चना वांढरे, भारती मडावी, द्वारकाबाई पिंपळकर, अरविंद मेश्राम, शारदा पांडे, साबीर कुरेशी, रत्नमाला ताडे, यासह कोरपना तालुक्यातील रास्तभाव दुकानदार उपस्थित होते.
प्रत्येक दुकानासमोर दरपत्रक व दक्षता समितीची कार्यकारिणी फलक लागणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अन्नपुरवठा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना धान्य वाटपात येणाऱ्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवून सर्व लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे निर्देश दिले.
बॉक्स
दुकानदारांनी अशा मांडल्या समस्या
दुकानदारांना वाटपात मिळणारे कमिशन कमी आहे, पीओसी मशीन व्यवस्थित काम करीत नाही, धान्यात तूट येते, हमाल मनमानीनुसार हमाली घेतात, कोरोना काळातील मोफत धान्य वितरणातील २ महिन्याचे कमिशन अजूनही प्राप्त झाले नाही, अशा अनेक समस्या दुकानदारांनी मांडल्या. दुकानदारांच्या सर्व समस्या शासनदरबारी मांडून सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन आ.सुभाष धोटे यांनी दुकानदारांना दिले.