फळांच्या राजावर पुन्हा प्रक्रिया
By admin | Published: June 23, 2014 12:01 AM2014-06-23T00:01:25+5:302014-06-23T00:01:25+5:30
कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करुन पिकविलेले आंबे पुन्हा चंद्रपुरातील बाजारात विक्रीस येत आहेत. या आंब्यांचा रंग आणि चव दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच बदलत असल्याने त्यात रसायनाचा वापर करण्यात येत
कार्बाईडचाच वापर : चंद्रपुरात करवाईनंतर सिंदेवाही पर्याय
चंद्रपूर : कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करुन पिकविलेले आंबे पुन्हा चंद्रपुरातील बाजारात विक्रीस येत आहेत. या आंब्यांचा रंग आणि चव दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच बदलत असल्याने त्यात रसायनाचा वापर करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चंद्रपुरातील मागील महिन्यात झालेल्या कारवाईनंतर काही व्यापाऱ्यांनी सिंदेवाहीत फळांच्या राजावर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे.
येथील वाहतूक कार्यालयासमोर अनेक फळविक्रेते बसतात. तुकूम, दुर्गापूर, शास्त्रीनगर आणि अन्य भागातील नागरिक रस्त्यावर भरणाऱ्या या बाजारातूनच फळ आणि भाजी विकत घेतात. गेल्या काही दिवसांपासून येथून आंबे विकत घेणाऱ्यांना वेगळाच अनुभव येत आहे.
येथून विकत घेतलेल्या आंब्यांचा रंगच दुसऱ्या दिवशी काळपट पडत असून, त्याची चवही वेगळी येत आहे. वारंवार असे प्रकार होत आहे. त्यामुळे पुन्हा फळांच्या राजावर प्रक्रिया होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मागील महिन्यात ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. त्यानंतर चंद्रपुरातील काही फळ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. येथील काही फळ व्यापाऱ्यांनी आपले बस्तान सिंदेवाहीत हलविले असल्याची माहिती आहे. सिंदेवाहीत कॅल्शिअम कार्बाईडमध्ये आंबे पिकवून ते दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी चंद्रपूरसह अन्य गावात विकण्यासाठी पाठविले जात आहे. मागील महिन्यात कृषी उत्पन्न बाजर समितीतील दोन फळविक्रेत्यांच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभाग, महसूल विभाग, वजनमापे आणि पोलिसांनी छापा टाकला होता. कॅल्शिअम कार्बाईडच्या पुड्या टाकलेले जवळपास साडेचार हजार किलो आंबे ताब्यात घेण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या आंब्यांची किंमत ६७ हजार ६७० रुपये इतकी होती. या कारवाईने धास्तावलेल्या काही मोठ्या फळ विक्रेत्यांनी सिंदेवाहीत आपली दुकानदारी पुन्हा सुरू केली आहे. (शहर प्रतिनिधी)