बाजाराच्या मागणीनुसार वस्तुंची निर्मिती करा
By admin | Published: March 3, 2017 12:49 AM2017-03-03T00:49:43+5:302017-03-03T00:49:43+5:30
महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे. अलीकडे कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिक क्रांती घडवित आहेत.
मुनगंटीवार यांचा बचतगटांना सल्ला : सरस महोत्सव स्वयंसिध्दा - २०१७
चंद्रपूर : महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे. अलीकडे कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिक क्रांती घडवित आहेत. विविध उत्पादने गटाच्या माध्यमातून महिला घेत आहेत. या गटांनी आता पारंपारिक उत्पादनांना बाजूला सारत बाजारात चांगली मागणी असलेल्या वस्तूंच्या निर्मितीकडे वळले पाहिजे, असा सल्ला राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
ग्रामीण विकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर तसेच जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा चंद्रपूर व गडचिरोलीच्या वतीने आयोजित महिला स्वयंसहायता गटामार्फत उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीकरिता विभागीयस्तरीय सरस महोत्सव स्वयंसिध्दा २०१७ च्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.नाना शामकुळे, आ.बाळू धानोरकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती ईश्वर मेश्राम, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, गोंदीयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पलकुंडवार, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, वर्धाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, उपविभागीय अधिकारी आर.दयानिधी, एस.राममूर्ती, विपीन इटनकर, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी अमन मित्तल, विकास उपायुक्त विपुल जाधव आदी उपस्थित होते.
बचतगटांच्या वस्तुला अलिकडे प्रचंड मागणी निर्माण झाली आहे. एका आॅनलाईन कंपनीने बचतगटाच्या वस्तु आॅनलाईन विक्रीसाठी ठेवल्या असता त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे आढळून आले. गटांनी आता पारंपारिक वस्तुंना बाजूला करून बाजाराच्या मागणीप्रमाणे वस्तुंची निर्मिती करावी, तसेच आॅनलाईन विक्रीवर भर द्यावा, असे मुनगंटीवार म्हणाले. महिला बचतगटांनी रोजगार देणारे बनावे, असेही ते म्हणाले.
बांगलादेशाने महिला बचतगटाच्या माध्यमातून क्रांती केली आहे. अशीच क्रांती आपणही करू शकतो. विविध क्षेत्रात महिला पुढे आहे. कौशल्य विकासात महिलांचे प्रमाण ५७ टक्के आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी मुलींचे प्रमाण ६८ टक्के आहे. नारी शक्तीचा रोजगार निर्मितीसाठी वापर झाला पाहिजे, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी आमदार सुरेश धानोरकर, जि.प.अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, विभागिय आयुक्त अनुपकुमार यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी केले.कार्यक्रमाचे आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी अशोक सिरसे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
बचतगटांमुळे महिला व्यवहारी झाल्या - हंसराज अहीर
बचतगटांमुळे देशातील महिलांमध्ये आर्थिक क्रांती घडून आली. ग्रामीण महिलांना आर्थिक व्यवहार समजले. त्या व्यवहारी झाल्या, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. बचतगटाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणात महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. प्रयत्न, परिश्रम आणि इच्छाशक्तीतून बदल घडविता येऊ शकतो, हे राज्यातील महिलांनी दाखवून दिले आहे. कोणत्याही क्षेत्रात कौशल्याला फार महत्व आहे. गटाच्या महिलांनी कौशल्य प्राप्त करून विविध वस्तुंचे दर्जेदार उत्पादन करावे आणि चांगली बाजारपेठ मिळवावी, यासाठी शासनसुध्दा सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण, दर्जा आणि गुणवत्तेच्या बळावर गटाची उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात जातील, असेही त्यांनी सांगितले. महिला गटांची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी, त्याला चालना देण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घेतला पाहिजे, असेही ना. अहीर म्हणाले.
३० हजार कुटुंबांना रोजगार
जिल्ह्यात महिलांचे १२ हजार गट अस्तित्वात आहे. ३० हजार कुटुंबांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष गटाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त झाला असल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी दिली. नागपूर विभागातील २२६ महिला गटांनी प्रदर्शनी व विक्री महोत्सवात सहभाग घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पाहुण्यांनी काही गटांच्या विक्री स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली. तसेच गटाच्या महिलांशी संवाद साधला. सदर प्रदर्शनात महिलांनी निर्मित केलेल्या विविध वस्तु ठेवण्यात आल्या आहे. प्रदर्शन ६ मार्चपर्यंत चालणार असून चंद्रपूरकरांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.