सिंदेवाही जिल्ह्याची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:21 PM2018-03-10T23:21:34+5:302018-03-10T23:21:34+5:30
चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून सिंदेवाही नव्या जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी नायब तहसीलदारामार्फत सिंदेवाही जिल्हा निर्मिती कृती समितीने एका निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे.
आॅनलाईन लोकमत
सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून सिंदेवाही नव्या जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी नायब तहसीलदारामार्फत सिंदेवाही जिल्हा निर्मिती कृती समितीने एका निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे.
सिंदेवाही हे शहर चंद्रपूर-नागपूर व चिमूर-गडचिरोली महामार्गावर असून मध्यवर्ती केंद्र आहे. सिंदेवाही, सावली, मूल, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर हे सहा तालुके मिळून सिंदेवाही जिल्हा निर्माण करण्याकरिता भौगोलिक परिस्थिती पूरक आहे. सहा तालुक्यातील प्रशासकीय कामाकरिता नागरिकांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे ब्रॉडगेज रेल्वे स्टेशन उपलब्ध आहे. मध्यवर्ती सुसज्ज बसस्थानक असून सहा तालुक्याशी जोडणाºया बसची सुविधाही उपलब्ध आहे. शहराच्या पूर्वेस सावली, पश्चिमेस चिमूर, उत्तरेस नागभीड, दक्षिणेस मूल व इशान्य व उत्तर दिशेला ब्रह्मपुरी तालुका आहे. येथून चिमूर ४० किमी, नागभीड ३८ किमी, ब्रह्मपुरी ४७ किमी, मूल २५ किमी, सावली ३० किमी अंतरावर आहे. त्यामुळे सिंदेवाही मुख्यालयात येण्याकरिता एस. टी. ला एक ते दीड तास आणि रेल्वेला एक तास लागतो. सिंदेवाही शहराची विदर्भात ओळख आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र व ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील ग्रामसेवक सिंदेवाही येथे प्रशिक्षणासाठी येतात. ब्रॉडगेज रेल्वेस्टेशन असल्यामुळे गोंदिया ते बल्लारपूर रेल्वे दररोज ये-जा करते. सिंदेवाहीला जिल्हा करावा, ही जुनी मागणी आहे. यापूर्वी कपूर समितीला निवेदन सादर केले होते. विभाजनानंतर सर्व दृष्टीने मध्यवर्ती केंद्र, जागेची उपलब्धता, दळणवळणाच्या सोयी, आर्थिक व प्रशासकीयदृष्ट्या सर्व सामान्यांना परवडणारे सिंदेवाही हे स्थळ आहे. त्यामुळे राजकीय दबावतंत्राला बळी न पडता सिंदेवाहीचा नवनिर्मित जिल्ह्याच्या यादीत समावेश करावा, असे निवेदन सिंदेवाही जिल्हा निर्मिती कृती समितीने दिले आहे. निवेदन देताना जिल्हा कृती समितीचे संयोजक मनोहर पवार, प्रा. देवराव बोरकर, संजय खोब्रागडे, सुरेश सोनवाने, किशोर मेश्राम, अरुणा चंद्रगिरीवार, रामदास निकूरे, मनोहर दाऊवार व कार्यकर्ते उपस्थित होते.