उत्पादन शुक्ल विभागाचे जिल्ह्यात छापे
By Admin | Published: September 16, 2016 01:38 AM2016-09-16T01:38:20+5:302016-09-16T01:38:20+5:30
जिल्ह्यात अवैध मद्य विक्रीवर राज्य शुल्क विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबविल्या जात
चंद्रपूर : जिल्ह्यात अवैध मद्य विक्रीवर राज्य शुल्क विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबविल्या जात आहे. गेल्या काही दिवसात धडक कारवाईची तिसरी मोहिम नुकतीच राबविण्यात आली. या धाडसत्रात सात आरोपींना अटक करण्यात आली असून हातभट्टीसह देशी, विदेशी मद्य जप्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात मद्य विक्रीस पूर्णपणे बंदी आहे. असे असतानाही चोरट्या मार्गाने हातभट्टीसह देशी व विदेशी मद्य विकण्याचा प्रयत्न होत आहे. या विरोधात उत्पादन शुल्क ठिकठिकाणी धाडसत्र राबवून कारवाई करीत आहे. गेल्या काही दिवसात यापूर्वी दोन मोठे धाडसत्र राबविण्यात आले होते. पाठोपाठ तिसरी मोठी मोहिम राबविण्यात आली.
अधीक्षक पराग नवलकर यांच्या नेतृत्वात अवैध मद्य विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी केलेल्या कारवाईत चंद्रपूर येथे उत्पादन शुल्कच्या पथकासह यवतमाळ, नागपूर व भंडारा येथीलही पथके सहभागी झाले होते.
या कारवाईत चंद्रपूर शहरात महाकाली कॉलनी, बाबुपेठ, जलनगर, रय्यतवारी कॉलनी, वडगाव वार्ड चंद्रपूर तसेच जुनोना, चिरोली, पळसगाव, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, राजुरा, वरुर व लक्कडकोट या ठिकाणी छापे टाकण्यात आले.
यात एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली तर १६ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील ७ गुन्हे वारस व ९ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे. यात एका दुचाकी वाहनासह ८७ हजाराचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. याशिवाय ७१५ लिटर मोहसडवा, १७ लिटर हातभट्टी, २०.७ लिटर देशी व ४२.४८ लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)