व्यावसायिकांनी कोरोना तपासणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 05:00 AM2021-03-14T05:00:00+5:302021-03-14T05:00:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : दैनंदिन व्यवसायाच्या निमित्ताने दररोजच विविध नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यावसायिकांनी तातडीने त्यांची आरटीपीसीआर कोरोना तपासणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दैनंदिन व्यवसायाच्या निमित्ताने दररोजच विविध नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यावसायिकांनी तातडीने त्यांची आरटीपीसीआर कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्स, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या समवेत काल नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकरी राहुल कर्डिले यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, बहुतांश व्यावसायिक सुपरस्प्रेडर गटात मोडतात, त्यामुळे त्यांनी स्वत:ची व इतरांची काळजी घ्यावी. तपासणीमुळे कोरोना आजाराचे लवकर निदान झाल्यास संभाव्य धोका टाळता येईल व फैलाव रोखता येईल, त्यामुळे व्यावसायानिमित्त बाहेर राहणाऱ्या लोकांनी कोरोनाची तपासणी तातडीने करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
कोव्हीड-१९ च्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, व्यवसायातील सर्व सहकारी, कर्मचारी, कामगारांची कोविड तपासणी करावी, तसेच नियमांचे पालण करण्याबाबत उद्योगातील आस्थापनांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना उद्युक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त व ६० वर्षावरील व्यावसायिकांनी कोरोना लसीकरण करून स्वत:ला सुरक्षीत करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, महानगरपालीकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, चेंबर ऑफ कामर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, उपाध्यक्ष सदानंद खत्री, रामजीवन परमार, सुमेध कोतपल्लीवार, प्रभाकर मंत्री, नारायण तोशनीवाल, दिनेश बजाज, आवळे, टहिल्यानी, एमआयडीसीचे मधुसूदन रुंगठा, प्रवीण जाणी आदी उपस्थित होते.