'त्या' प्राध्यापकाने केली विदर्भातील चार जिल्ह्यातील महिलांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2022 10:46 AM2022-09-07T10:46:03+5:302022-09-07T12:21:25+5:30

सोशल मीडियावर तयार केले बनावट आयडी; गुन्हे शाखेने भंडारा येथून केली अटक

professor cheated women in four districts of Vidarbha, the crime branch arrested him from Bhandara | 'त्या' प्राध्यापकाने केली विदर्भातील चार जिल्ह्यातील महिलांची फसवणूक

'त्या' प्राध्यापकाने केली विदर्भातील चार जिल्ह्यातील महिलांची फसवणूक

googlenewsNext

चंद्रपूर : फेसबुक व मॅट्रोमनीवर बनावट आयडी तयार करून महिलांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे लाटणे तसेच संधी साधून चोरी करणाऱ्या प्राध्यापकाला स्थानिक गुन्हे शाखेने भंडारा येथून केली अटक केली आहे. त्याच्याकडून २९० ग्रॅम सोने, मोबाईल असा एकूण १२ लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोहम वासनिक, रा. भागडी, ता. लाखांदूर, जि. भंडारा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारीसह, भंडारा, यवतमाळ, नागपूर येथील महिलांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

सोहम वासनिक हा एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे. त्याने सोशल मीडियावर सुमित बोरकर या नावाने बनावट आयडी बनवली. यातून तो महिलांशी मैत्री करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथील एका ६७ वर्षीय विधवा महिलेशी सोशल मीडियावर मैत्री केली. तिचा विश्वास संपादन केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिच्या घरी मुक्कामाला आला. सकाळी ती महिला मॉर्निंग वाॅकला गेली. अशातच त्याने संधी साधून तिच्या घरातून २४ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला.

याबाबत पीडित महिलेने कोठारी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांचे पथक गठित केले. तांत्रिक तपासाच्या आधारे पथकाने भंडारा येथून सोहम वासनिक याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, नापोशि नीतेश महात्मे, जमिर पठाण, अनुप डांगे, नीतेश महात्मे, पोशि प्रसाद धुलगंडे, मयूर येरणे, प्रमोद कोटनाके आदींनी केली.

अशी करायचा महिलांची फसवणूक

सोहम वासनिक याने फेसबुक, मॅट्रोमनी, जीवनसाथी आदी सोशल मीडियावर सुमित बोरकर या नावाने बनावट आयडी बनवली. याद्वारे तो महिलांशी संपर्क करून मैत्री करायचा. आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. तसेच माझ्या पत्नीचे निधन झाले असून मला एक मुलगी आहे, असे सांगायचा. त्याने बनावट आयडी कार्ड तसेच एक लाख ४४ हजार रुपयांची बनावट वेतनपावती तयार करून त्यावर दुसऱ्याच व्यक्तीचा फोटा चिकटवून महिलांना पाठवायचा. तसेच मला लग्न करायचे आहे, असे सांगून विश्वास संपादन करायचा. त्यानंतर त्या महिलांच्या घरी जाऊन त्यांना काही अडचणी सांगून पैसे व दागिन्यांची मागणी करायची. पैसे न दिल्यास चोरी करायचा. त्याने यापूर्वी भंडारा, यवतमाळ, नागपूर येथील महिलांची फसवणूक केली आहे.

Web Title: professor cheated women in four districts of Vidarbha, the crime branch arrested him from Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.