प्राध्यापक पतीने पैशासाठी पत्नीला फासावर लटकवले; सुदैवाने दोरी तुटली अन्..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 11:07 AM2022-09-20T11:07:50+5:302022-09-20T11:12:39+5:30
पतीविरुद्ध गुन्हा दाखल
राजुरा (चंद्रपूर) : येथील एका प्राध्यापकाने पैशासाठी चक्क आपल्या पत्नीला फासावर अडकविले. मात्र, दोरी तुटल्याने सुदैवाने ती बचावल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि. १८) उघडकीस आली. पीडितेच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रा. मंगेश कुळमेथे (रा. बिरसा मुंडा नगर, राजुरा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्रा. मंगेश कुळमेथे याचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले. सुरुवातीला कुटुंब एकत्रच राहत होते. मात्र, काही दिवसांनी सासू, सासरे व दीर जवळच वेगळ्या घरात राहू लागले. दरम्यान, अवघ्या चार महिन्यांतच प्रा. कुळमेथे याने पत्नीकडे पैशासाठी तगादा लावला. पत्नीने एकदा माहेरून दोन लाख रुपये आणून दिले. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने वडिलांना पुन्हा पैसे देणे शक्य नव्हते.
१४ सप्टेंबर रोजी माहेरून पैसे आणण्याबाबत पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन प्राध्यापक पती, सासरे व दीर या तिघांनी पंख्याला दोरी बांधून पीडितेला पलंगावर खुर्ची ठेवून त्यावर उभे करून फासावर अडकविले आणि सर्वजण समोरच्या खोलीत जाऊन बसले. मात्र, सुदैवाने पंख्याला अडकवलेली दोरी तुटल्याने ती बचावली. अखेर भेदरलेल्या महिलेने मागच्या दाराने घराबाहेर पळ काढला आणि पहाटेपर्यंत राजुरा बसस्थानकावर आश्रय घेतला.
सकाळ होताच ती माहेरी गेली. मात्र, तब्येत बरी नसल्याचे आई-वडिलांना कारण देऊन घरी आल्याचे तिने सांगितले. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणीसाठी चंद्रपूर येथे गेली असता, आपल्या बहिणीला सर्व आपबीती सांगितली. अखेरीस १८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राजुरा पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती प्रा. मंगेश कुळमेथे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
सासरे, दीराचाही सहभाग
आरोपी प्रा. मंगेश कुळमेथे याच्या घराशेजारीच सासरे व दीर राहतात. पतीसोबत वाद घातल्यानंतर आरोपी कुळमेथे याने सासरे व दिराला घरी बोलावले. त्याच रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास दारू प्यालेल्या प्राध्यापक पतीने पुन्हा वाद घातला. तिघांनीही दमदाटी केली आणि पैसे आणण्यास सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले, अशी माहिती राजुरा पोलिसांनी दिली.
पैशासाठी पतीने पत्नीला फासावर अडकविल्याची तक्रार प्राप्त झाली. पीडित महिलेच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न आणि हुंडाबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
- प्रशांत साखरे, सहायक पोलीस निरीक्षक, राजुरा